‘कंपनीत काम द्या नाहीतर कंपनीवर जेसीबी फिरवतो’ अशी या उद्योजकाला धमकी देणारे जेरबंद

0
297

आळंदी, दि. १२ (पीसीबी) – कंपनीत काम द्या नाहीतर उद्या कंपनीवर जेसीबी फिरवतो, अशी धमकी देत कंपनीत काम मागणा-या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते 10 जानेवारी रोजी दुपारी चार या कालावधीत च-होली खुर्द येथील तारीनी स्टील प्रा ली या कंपनीत घडला.

श्रीधर भीमा शिंदे आणि त्याच्या सोबत असलेला एक अनोळखी इसम (रा. च-होली खुर्द, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बसंत कैलास गुप्ता (वय 49, रा. आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुप्ता हे च-होली येथील तारीनी स्टील प्रा ली या कंपनीत काम करतात. आरोपी त्यांच्या कंपनीत जबरदस्तीने घुसले. आरोपींनी कंपनीचे मालक अभिषेक अग्रवाल यांना ‘मला कंपनीत काम द्या. मला काम दिले नाही तर कंपनीवर उद्या जेसीबी मशीन फिरवतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादी गुप्ता यांना हाताने मारहाण केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.