Pimpri

कंपनीतील हिस्सा काढून घेतल्यानंतर गहाण मालमत्तांच्या जप्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊन फसवणूक

By PCB Author

November 25, 2021

– एक कोटी 18 लाखांच्या फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे, दि. २५ (पीसीबी) – भागीदारीमध्ये व्यवसाय करताना कंपनीतील भागीदारांनी व्यवसाय वाढीसाठी अडीच कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यासाठी कंपनीच्या नावे असलेल्या मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या. या कर्जाची परतफेड पूर्ण होण्यापूर्वीच तीन भागीदारांनी त्यांचा कंपनीतील हिस्सा काढून घेतला. असे असताना हिस्सा काढून घेतलेल्या दोन्ही भागीदारांनी बँकेला गहाण मालमत्ता जप्त करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले. यामध्ये कंपनीची एक कोटी 18 लाख 52 हजार 840 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद भागवत पोखरकर (रा. शहा कॉलनी, तळेगाव दाभाडे), मोनिका मिलिंद पोखरकर (रा. शहा कॉलनी, तळेगाव दाभाडे), अतुल उर्फ लक्ष्मण भागवत पोखरकर (रा. शहा कॉलनी, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रसिका भालेराव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आणि आरोपी हे भागीदारीमध्ये व्यवसाय करत होते. त्यांनी एकत्रितपणे मार्क व्हेंचर आणि मार्क इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्या स्थापन केल्या. कंपनीच्या व्यवसाय वाढीसाठी सर्व भागीदारांना कर्ज घेण्याचे ठरवले. शोभानगर कॉलनी तळेगाव दाभाडे येथील जिली फ्लॉवर अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर एक ते सात आणि फ्लॅट नंबर 10, इवा अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर 22, अलिबाग तालुक्यातील पावेले खंडाळे गावातील सर्वे नंबर 16/1 ब मधील 0.31 गुंठा आणि 16/2 मधील 06.3 गुंठा जमीन जी एस महानगर बँकेकडे गहाण ठेवली. त्यातून कंपनीच्या व्यवसाय वाढीसाठी दोन कोटी 50 लाख रुपये एवढे कर्ज घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता आरोपी मिलिंद, मोनिका व अतुल पोखरकर यांनी मार्क व्हेंचर कंपनीमधून त्यांचा हिस्सा काढून घेतला. त्या मोबदल्यात एक कोटी 84 लाख रुपये घेऊन हक्कसोडपत्र देखील लिहून दिले. असे असताना आरोपींनी जी एस महानगर बँकेला मार्क व्हेंचर कंपनीची स्थावर गहाण मालमत्ता जप्त करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यात फिर्यादी यांची एक कोटी 18 लाख 52 हजार 840 रुपयांची फसवणूक झाली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.