कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसून तोडफोड करत मागितली 50 हजारांची खंडणी

0
233

निगडी, दि. २१ (पीसीबी) – कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसून पाच जणांनी तोडफोड केली. ऑफिसमधील महिलांसोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. तसेच माथाडी कामगारांना देत असलेले दरपत्रक दाखवण्याची मागणी करत 50 हजारांची खंडणी मागितली. हा प्रकार 6 सप्टेंबर रोजी प्राज कंपनीज लॉजिस्टिक सर्व्हिसेस प्रा ली, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे घडली.

नवनाथ शेवाळे, उत्तम शिंदे, विक्रम मोरे, अमोल तावरे, अजित जैद (सर्व रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संजय लहुराव बांदल (वय 54, रा.संभाजीनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जबरदस्तीने फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. फिर्यादी यांना शिवीगाळ करत ऑफिसमधील सामानाचे नुकसान केले. ऑफिसमधील महिलांसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ‘टाटा मोटर्स पीसीबीयू व सीव्हीबीयू युनिट्स ऑफ द टीएमएल या कंपनीमधील माथाडी कामगारांना देत असलेले दरपत्रक दाखव. नाहीतर तुझ्याकडे बघून घेऊ. आत्ता आम्ही पाचजण आलोय. उद्या 100 ते 200 जणांना घेऊन येतो का नाही ते बघ’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे महिन्याला 50 हजारांची खंडणी देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास कंपनीत काम करू देणार नाही. त्यांची ठेकेदारी बंद पाडून टाकू आणि दुस-यांना काम दिले तर त्यांच्या व फिर्यादी यांच्याकडे बघून घेऊ अशी आरोपींनी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.