कंधारप्रकरणात भारताने सोडलेल्या दहशतवाद्यानेच घडवला अनंतनागमधील हल्ला ?

0
457

श्रीनगर, दि. १४ (पीसीबी) – १९९९ साली एअर इंडिया विमान अपहरणाच्या घटनेनंतर तत्कालिन वाजपेयी सरकारने सुटका केलेल्या मुश्ताक अहमद झरगर या दहशतवाद्याचा अनंतनाग येथील दहशतवादी हल्ल्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये ५ जवानांना वीरमरण आले होते.

२४ डिसेंबर १९९९ रोजी इंडियन एअर लाईन्सचे आयसी ८१४ या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. यामध्ये १७६ प्रवासी आणि १५ क्रू मेंमर्स होते. त्यांना सोडण्यासाठी दहशतवाद्यांनी ३५ दहशतवाद्यांची सुटका आणि २०० दशलक्ष डॉलर्सची मागणी केली होती. दरम्यान, तत्कालिन सरकारने याला नकार दिला होता. त्यानंतर मसूद अजहर, मुश्ताक अहमद झरगर आणि शेख अहमद उमर सईद या दहशतवाद्यांना सोडण्यात आले.यानंतर अपहरण करण्यात आलेले विमान सोडण्यात आले. दरम्यान, यात सोडण्यात आलेल्या मुश्ताक अहमद झरगर याचा अनंतनागमधील सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

अनंतनाग येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्लात ५ जवान शहीद झाले होते. तर ३ पोलीस जखमी झाले होते. दरम्यान, झरगर या हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या हल्ल्यामागे अल-उमर-मुजाहिद्दिन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांनीही व्यक्त केला आहे. जैश-ए-मोहम्मग आणि अल उमर या दोन दहशतवादी संघटनांची हा हल्ला केला असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. केवळ अल-उमर-मुजाहिद्दिन ही संघटना या घटना घडवण्यासाठी सक्षम नसून अहमद झरगर जैश आणि अल उमरच्या सहाय्याने काश्मिरमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

झरगर पुन्हा एकदा आता काश्मिरमध्ये दहशतवाद पसरवण्याची तयारी करत आहे. यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. यानंतर सैन्याने मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. अल-उमर-मुजाहिद्दिनचा म्होरक्या मुश्ताक अहमद झरगर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा काश्मिरमध्ये सक्रिय झाला आहे. झरगर हा बऱ्याच काळापासून जम्मू-कश्मीर लिब्रेशन फ्रंटचा भाग होता आणि आता तो पाकिस्तानात सक्रिय आहे.