औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमकडून आमदार इम्तियाज जलिल यांना उमेदवारी

0
453

औरंगाबाद, दि. २६ (पीसीबी) – एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी अखेर आमदार इम्तियाज जलील यांच्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. हैदराबाद येथे आमदार इम्तियाज जलील आणि काही नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर ओवेसी यांनी हा निर्णय घेतला. एमआयएम पक्षाने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविली पाहिजे, असा आग्रह आमदार इम्तियाज यांनी प्रारंभापासून धरला होता.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार इम्तियाज जलील यांच्या नावाची घोषणा सोमवारी रात्री एमआयएमचे प्रमुख अॅड. असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद येथे केली. त्यामुळे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे उमेदवार आमदार सुभाष झांबड आणि इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी सामना होणार हे निश्चित झाले. आमदार इम्तियाज यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी एमआयएमचे २५ नगरसेवक, कार्यकर्ते दोन दिवसांपासून हैदराबादेत तळ ठोकून होते. सोमवारी सकाळी ११.३० वाजता एमआयएमचे मुख्यालय दार उस सलाम येथे ओवेसी यांच्यासोबत दोन तास बैठक चालली. त्यानंतर सायंकाळी ओवेसींच्या जाहीर सभेनंतर पुन्हा बैठक झाली. त्यानंतर रात्री ११ च्या सुमारास इम्तियाज जलिल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उमेदवारी निश्चित झाल्याचे कळताच इम्तियाज यांच्या समर्थकांनी औरंगाबादमध्ये विविध भागांत फटाके वाजवून व मिठाई वाटप करून जल्लोष केला.