औरंगाबाद काँग्रेसमध्ये खुर्च्यांवरुन राजकारण; राजीनाम्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यालयातील खुर्च्या सोबत नेल्या

0
383

औरंगाबाद, दि. २६ (पीसीबी) – लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गांधी भवन या पक्ष कार्यालयातील खुर्च्या देखील सोबत नेल्या आहेत. सत्तार यांच्या या खुर्च्या पळवा-पळवीमुळे आज गांधी भवन मध्ये होत असलेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्वादी भवनमध्ये हलवण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरातील गांधी भवन या काँग्रेस कार्यालयात तीनशे खुर्च्या होत्या. केशवराव औताडे जिल्हाध्यक्ष असताना येथे सतरंज्या टाकून बैठक होत असे. अब्दुल सत्तार यांच्या मते त्यावेळी खुर्च्या त्यांनी खरेदी केल्या होत्या. आता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर तिथल्या खुर्च्या देखील ते घेऊन गेले आहेत. त्यामुळे गांधी भवनमध्ये केवळ टेबल शिल्लक आहेत. “माईक सिस्टिमदेखील मी खरेदी केली आहे. ती पण मी घेऊन जाईल”, असे देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद लोकसभेची जागा काँग्रेस लढवत आहे. पक्षाकडून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असे असताना देखील काँग्रेसला आज ठरवलेली कार्यकर्त्यांची बैठक सत्तारांच्या खुर्ची खेळामुळे राष्ट्रवादी भवनमध्ये हलवावी लागली आहे. सकाळी ११ वाजेची ही बैठक १२ पर्यंत देखील सुरु झाली नव्हती. औरंगाबाद लोकसभेच्या खुर्चीसाठी सुरु झालेली ही लढाई काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीमुळे प्रचाराच्या सुरवातीलाच कार्यालयातील खुर्च्या पळवापळवी पर्यंत पोचली आहे. असाच अंतर्गत संघर्ष सुरु राहिला तर सेना-भाजपचा पराभव कसा करणार? हा प्रश्न निर्माण होत आहे.