Maharashtra

औरंगाबादमध्ये शिवजयंतीच्या मिरवणूकीत घुसून तरूणाच्या हत्याप्रकरणी एकास अटक

By PCB Author

February 21, 2020

औरंगाबाद, दि.२० (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी राज्यात मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली. गावखेड्यात आणि शहरांत महाराजांची भव्या मिरवणूकीही काढण्यात आल्या. शिवजयंतीच्या मिरवणूकीत घुसून एका तरूणाची औरंगाबादमध्ये हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे.

विजय ऊर्फ छोटू शिवाजी वैद्य (रा. केंब्रिज चौक, चिकलठाणा)  असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत गोपीचंद शिंदेचं सध्या बी.ए. चे शिक्षण सुरू आहे. बुधवारी, १९ फेब्रुवारी (बुधवार) रोजी मित्रांसोबत तो मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. हनुमाननगरकडून पुंडलिकनगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या मिरवणूकीत तो सहभागी झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन कॉलनीत राहणारा मृत श्रीकांत हा गारखेडा परिसरातून निघणाऱ्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी सायंकाळी घरातून बाहेर पडला. मिरवणुकीत तो मोठा भगवा झेंडा हातात घेऊन फिरवत होता. त्याला विजय ऊर्फ छोटू शिवाजी वैद्य (रा. केंब्रिज चौक, चिकलठाणा) याने झेंडा फिरविण्यासाठी मागितला. मात्र, श्रीकांतने त्याला झेंडा द्यायला नकार दिला. त्यातून विजय ऊर्फ छोटू आणि राहुल भोसलेसोबत श्रीकांतचा वाद झाला. त्याचवेळी आरोपीने विजय वैद्य आणि  राहुल भोसले याने चाकू श्रीकांतच्या छातीत खुपसला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे श्रीकांत जमीनीवर कोसळला. आरोपींनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच श्रीकांतच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर श्रीकांतला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आरोपींना पकडण्यासाठी चार पथके नेमण्यात आली होती. पोलिसांनी गुरुवारी पहाटे विजय वैद्य याला अटक केली. तर राहुल भोसलेचा शोध लागला असून तो लवकरच हाती येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले. विजय हा नुकताच एका नामांकित औषध निर्माण करणाऱ्या कंपनीत कामाला लागला होता. त्याच्याविरुद्ध तीन दिवसांपूर्वीच पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात एका तरुणाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्याला अटक झालेली नव्हती. त्यातून पोलिसांना विजय वैद्य हा आरोपी हाती लागला. तर दुसराही आरोपी अटक केल्याशिवाय श्रीकांतचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. मात्र त्यांची पोलिसांनी समजूत घातल्यानंतर मृतदेह स्वीकारला. या प्रकरणातील दुसरा आरोपी राहुल भोसले याचाही ठावठिकाणा हाती लागला असून त्याला रात्रीपर्यंत अटक केलेली असेल, असे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पुंडलिकनगर पोलिस करत आहेत.