Maharashtra

औरंगाबादमध्ये पोलीसच निघाला मंगळसूत्र चोर; चोरलेले सोने गहाण ठेवून घ्यायचा तारण कर्ज

By PCB Author

October 12, 2018

औरंगाबाद, दि. १२ (पीसीबी) – मंदिरात देव दर्शनासाठी आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोराने नवे तर एका पोलीसाने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.११) रात्री नऊच्या सुमारास औरंगाबादमधील बीड बायपास रोडवर स्वामी समर्थ मंदिर परिसरात घडली.  

योगेश शिणगारे असे या चोरट्या पोलिस शिपायाचे नाव असून तो राज्य राखीव दलात शिपाई म्हणून कार्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास एक महिला औरंगाबाद येथील बीड बायपास रोडवर असलेल्या स्वामी समर्थ मंदिर परिसरात दर्शनासाठी आली होती. यावेळी पोलिस शिपाई योगेश याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले. याबाबत महिलेने सातारा परिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनेचा तपास करत योगेश याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने यापूर्वीही तीन मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली आहे. मंगळसूत्र चोरुन तो सोनंतारण कर्ज घ्यायचा, अशीही माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. सातारा परिसरत पोलीस अधिक तपास करत आहेत.