औरंगाबादमध्ये थेट पत्रकारालाच मारहाण

0
561

 

औरंगाबाद, दि.२६ (पीसीबी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिर्बंध अधिकार मिळाल्याने पोलीस सर्वसामान्यांना जनावराप्रमाणे मारहाण करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत, मात्र औरंगाबादमध्ये पोलिसांनी थेट पत्रकारालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख मनोज जाधव यांना ही मारहाण करण्यात आली आहे.

देवगडहून औरंगाबादला जात असताना मनोज जाधव यांची गाडी अडवण्यात आली. आपण पत्रकार असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितले तसेच सोबतचे आयकार्ड देखील दाखवले मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्यांना मारहाण केली. माझे नाव आणि नंबर पाहा आणि तुला काय करायचे ते कर, अशी अरेरावीची भाषा यावेळी मारहाण करणाऱ्या हवालदाराने केली.
याप्रकरणी तिथेच बसलेल्या फौजदाराला विचारणा केली असताना त्यानेही हवालदाराला आवरण्याचे कष्ट घेतले नाहीत. मारहाण करणारे पोलीस गंगापूर पोलीस ठाण्याचे आहेत. यासंदर्भात गंगापूर पोलीस ठाण्याचे पीआय सुरवसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीचे आदेश आहेत, मात्र पत्रकार अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने त्यांना वार्तांकनासाठी फिरण्याची मुभा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसे आदेश आहेत, मात्र औरंगाबाद पोलिसांकडून मुख्यमंत्री तसेच पंतप्रधानांच्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम करण्याच आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.