औरंगाबादमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन यांच्या समर्थकांनी भाजप नेत्याची गाडी फोडली; ड्रायवरलाही केली जबर मारहाण

0
2793

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – औरंगाबाद महानगरपालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून  आज (शुक्रवारी) भाजपाच्या काही नगरसेवकांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना बेदम मारहाण केली. त्याचे पडसाद लगेच उमटले आहेत. एमआयएम नगरसेवक समर्थकांनी औरंगाबाद महानगरपालिका परिसरात तुफान दगडफेक  केली असून भाजपा संघटन मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड करत चालकाला जबर मारहाण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर औताडे, प्रमोद राठोड यांनी पोलीस आयुक्त प्रसाद यांची भेट घेतली. हे सर्व जाताना भाजपा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या वाहनावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने काठी, दगडाने हल्ला केला.  या घटनेमध्ये गाडीचे चालक विलास काशिनाथ कोराळे यांना लाथा लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या सर्व घटनेमध्ये हस्तक्षेप करीत  कोराळे यांची कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. या घटनेमुळे महापालिकेसमोर तणावाचे वातावरण असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.