औंध – रावेत रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करणार; 24 कोटींचा खर्च

0
337

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी फाटा ते कावेरीनगर सब वे पर्यंतचा रस्ता तसेच डांगे चौक ते ताथवडे चौकापर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहे. या दोन्ही कामांसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रीया राबविण्यात आली असून या रस्त्यांसाठी तब्बल 24 कोटी रूपये खर्च होणार आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत सांगवी ते किवळे हा बीआरटीएस रस्ता विकसित केला आहे. या रस्त्यादरम्यान सांगवी फाटा ते कावेरीनगर सब वे पर्यंतचा रस्ता तसेच डांगे चौक ते ताथवडे चौकापर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहे. या दोन्ही कामांसाठी महापालिकेच्यावतीने स्वतंत्र निविदा प्रक्रीया राबविण्यात आली. सांगवी फाटा ते कावेरीनगर सब वे रस्त्यासाठी 14 कोटी 74 लाख रूपये आणि डांगे चौक ते ताथवडे चौकापर्यंतच्या रस्त्यासाठी 16 कोटी 27 लाख रूपये निविदा दर निश्चित करण्यात आला.

सांगवी फाटा ते कावेरीनगर सब वे रस्त्यासाठी रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 14 कोटी 70 लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, दोन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी श्री गणेश कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 23.70 टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच 11 कोटी 22 लाख रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 17 लाख 77 हजार आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 3 लाख 83 हजार रूपये असे एकूण 11 कोटी 43 लाख रूपये खर्च होणार आहेत.
डांगे चौक ते ताथवडे चौकापर्यंतच्या रस्त्यासाठी रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग शुल्क वगळून 16 कोटी 24 लाख रूपये दर ठरवून निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार, पाच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी ए. आर. कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 23 टक्के कमी दराने निविदा सादर केली. म्हणजेच 12 कोटी 51 लाख रूपये अधिक रॉयल्टी चार्जेस 18 लाख 36 हजार आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 2 लाख 50 हजार रूपये असे एकूण 12 कोटी 71 लाख रूपये खर्च होणार आहेत. या दोन्ही रस्त्यांसाठी एकूण 24 कोटी 15 लाख रूपये खर्च होणार आहेत.याबाबतच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.