औंधचे उद्योजक नाना गायकवाड गुन्ह्यांच्या तपासासाठी ‘एसआयटी’..

0
562

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) : औध येथील उद्योगपती असलेल्या गायकवाड पिता पुत्रांवर पिंपरी- चिंचवडमध्ये एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवड पोलिसांनी मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अन्वये कारवाई केली आहे. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुरुवारी (दि. २) रात्री या पथकाची नेमणूक केली.

गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय ३६), नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आयटीआय रोड, औंध, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टोळीप्रमुखांची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी गणेश गायकवाड, नानासाहेब गायकवाड हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पिंपरी- चिंचवडमधील सांगवी, हिंजवडी आणि चिखली पोलिस ठाण्यात दंगा, खुनाचा प्रयत्न, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण, कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुक, खंडणी उकळण्यासाठी मारहाण, अनैसर्गिक संभोग करून खूनाचा प्रयत्न, दरोडा घालणे असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. याव्यतिरिक्त पुणे शहर आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीतही गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यांच्या जोरावर गायकवाड टोळीचे सदस्य संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नुकतेच त्यांच्यासह अन्य सदस्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासात सुसूत्रता यावी, आरोपीच्या वकिलांना आरोपींचा बचाव करण्यासाठी मुद्दे मिळू नयेत, तसेच तपास अधिकारी कोणाच्या दबावाखाली येऊ नये, यासाठी उपायुक्त आनंद भोईटे यांच्या निगराणी खाली तपास करण्याचे आदेश कृष्ण प्रकाश यांनी निर्गमित केले आहेत. एकंदरीतच गायकवाड पिता- पुत्रांना त्यांच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसले.
‘एसआयटी’ मध्ये पथक प्रमुख सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलिस निरीक्षक सुनील टोणपे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सागर पानमंद, सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख आदींचा समावेश आहे.