Videsh

ओसामा बिन लादेनच्या मुलावर अमेरिकेने जाहीर केले १ दशलक्ष डॉलरचे इनाम

By PCB Author

March 01, 2019

न्यूयॉर्क, दि. १ (पीसीबी) – ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने खात्मा केला मात्र त्याचा मुलगा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरला आहे. ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा याने आता ओसामाची जागा घेतली आहे. ओसामा बिन लादेनच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हामजा कट रचतो आहे, त्याने अमेरिकेविरोधात काही दहशतवादी कारवाई करण्याआधीच तो अमेरिकेला हवा आहे. त्याचमुळे १ दशलक्ष डॉलरचा इनाम अमेरिकेने जाहीर केला आहे. हामजाला जिहादींचा राजा असे संबोधले जाते.

गेल्या काही दिवसांपासून अल कायदा ही दहशतवादी संघटना शांत आहे, मात्र ते आत्मसमर्पण नाही. आम्हाला याबाबत कोणतीही चूक करायची नाही. अल कायदा या दहशतवादी संघटनेकडे हल्ला करण्याची क्षमता आणि कारण या दोन्ही गोष्टी आहेत, त्यामुळे आम्हाला हामजाने काही कारवाई करण्याआधी तो हवा आहे असे अमेरिकेतले अधिकारी नॉथन सेल्स यांनी म्हटले आहे.

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने अबोटाबादमध्ये ठार केले होते. ओसामा बिन लादेनने अमेरिकेतल्या ट्विन टॉवरवर विमान हल्ला केला होता. ज्या घटनेत अडीच हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेनला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले. त्याचा ठाव ठिकाणा समजताच त्याला ठार करण्यात आले. आता अमेरिकेला हाजमा हवा आहे कारण हाजमा बिन लादेन हा अल कायदासह इतर जिहादी संघटनांचा म्होरक्या झाला आहे. त्याने दहशतवाद्यांचे जाळेही उभारण्यास सुरुवात केली आहे.