ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा आंदोलन – खासदार धैर्यशील माने

0
644

कोल्हापूर, दि. २० (पीसीबी) – अतिवृष्टीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच दोन जिल्ह्यातील पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांचे कर्ज सरसकट माफ करावे या प्रमुख मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले आहे. ५ सप्टेंबर पर्यंत याबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार माने यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी आमदार सुजित मिणचेकर व सत्यजित पाटील सरूडकर उपस्थित होते.

पूर बाधित क्षेत्रातील उद्योजक व्यापारी यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक अनुदान द्यावे, अतिवृष्टीने संपूर्ण घर पडल्याने ज्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत त्यांना घरे बांधून द्यावीत, तोपर्यंत त्यांच्यासाठी निवारा शेड उभारावी.

मोलमजुरी करणाऱ्या व शेतमजुरांना पंधरा दिवस काम मिळालेली नाही .त्यांना किमान दोन महिन्याचे धान्य द्यावे, अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी भरीव अनुदानात वाढ करावी. बाधित क्षेत्रातील सर्व शेतकरी उद्योजक नागरिकांची वीज बिल माफ करावे. नदीकाठावरील प्रत्येक गावांना बोट द्यावी. पूरग्रस्त गावात नावाड्यांना विशेष अनुदान द्यावे.