ओबीसी, मुस्लिम, मागासवर्गीयांसह सर्वधर्मियांना राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुकीत संधी देणार..

0
534

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत कोणत्याही जाती-धर्मामध्ये भेदभाव न करता सर्व धर्मियांना निवडणुकीसह सत्तेचा भागीदार बनविले आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ओबीसी, मुस्लिम, मागासवर्गीय व सर्व जाती धर्माच्या लोकांना योग्य प्रमाणात संधी दिली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर तथा मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर योगेश बहल यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेसंदर्भात राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केली आहे. याबाबत बहल यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय पहिल्यांदाच महापालिका निवडणुका होत असल्या तरी सर्वधर्मांना समान न्याय देण्याचे धोरण राष्ट्रवादीने सुरुवातीपासून अंगिकारले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील भूमिपूत्रांना न्याय देतानाच बाहेरून आलेल्यांनाही सर्वाधिक संधी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण न्यायालयाने नाकारले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस या समाजाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी कटीबद्ध असून मुस्लिम बांधवांसह मागासवर्गीयांनाही समान संधी देण्याचे राष्ट्रवादीचे तत्त्व राहिल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा. शरद पवारसाहेब व उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे धोरण यशस्वीपणे राबवून अनेकांना संधी आत्तापर्यंत दिली आहे. महिला आरक्षण असो किंवा इतर जाती धर्मियांचे नेतृत्व विकसित करण्याचे कार्य पवारसाहेबांनी तहहयात केले आहे. यापुढेही स्थानीक भूमीपुत्रांसह ओबीसी, मुस्लिम, मागासवर्गीय व सर्वधर्मियांना, समाजाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनच मिळेल, असे बहल यांनी सांगितले.
ओबीसीचे आरक्षण केवळ भाजपच्या नाकर्तेपणामुळे गेले असून राज्यात त्यांची सत्ता असताना त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय आणि केंद्र सरकारने इम्पीरिकल डेटा उपलब्ध करून न दिल्यामुळेच ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. मात्र, राजकीय स्वार्थासाठी खोट बोलण्याची सवयी असलेल्या भाजपच्या भूलथापांना बळी न पडला सर्वधर्मियांना समान संधी देणार्‍या राष्ट्रवादीलाच महापालिका निवडणुकीत शहरातील जनता संधी देईल, असा विश्वासही बहल यांनी व्यक्त केला आहे.