Maharashtra

ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागलं

By PCB Author

May 07, 2022

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणावरुन महाविकास आघाडी आणि खासकरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, फडणवीसांनी आमच्यावर आरोप लावला की आमच्या जवळचे डोंगरे ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात गेले आहेत. ते खोटं बोलत आहेत. ओबीसी आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे लागलं आहे, असं पटोलेंनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, इम्पिरिकल डेटा दिला जात नाही म्हणून अडचण झाली आहे. मोहन भागवत यांनी आरक्षणाशिवाय भारत पाहिजे अशी अनेकदा घोषणा केली. आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल मुख्य न्यायमुर्ती यांची भेट घेतली आहे, असंही त्यांनी सांगितलं. फोन टॅपिंगसंदर्भात काय म्हणाले नाना पटोले… फोन टॅपिंगसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितलं की, डीपीसी लेव्हलच्या अधिकाऱ्यांनी माझे जबाब घेतले. माझा आवाज आहे का याची ही विचारणा केली. राजकीय दृष्ट्या हे फोन टॅपिंग केले आहेत. माझा कुठला व्यवसाय नाही. कुणाच्या अंतर्गत जीवनात असं करता येत नाही. रश्मी शुक्ला यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे केल हे महत्वाचं होतं. शासकीय निवासस्थानी राहण्यासंदर्भात ते म्हणाले की, बंगला खाली करायला मला सांगितलेलं नाही. रावसाहेब दानवेही शासकीय बंगल्यात राहायचे,असंही ते म्हणाले.