Desh

ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा; राज्यसभेत विधेयकाला मंजुरी

By PCB Author

August 06, 2018

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – लोकसभेत ३ ऑगस्टला मंजूर झालेले ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचे विधेयक राज्यसभेतही आज (सोमवार) मंजूर करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी हे विधेयक मंजूर झाल्याने भाजप कार्यकर्ते आणि देशाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. १५६ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. तर या विधेकाच्या विरोधात एकही मतदान  झाले नाही.

या विधेयकामुळे राज्यांच्या अधिकारांमध्ये घट होण्याची शंका निराधार आहे, असे केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटले आहे. राज्यांना जातीचा समावेश ओबीसीच्या केंद्रीय सूचीमध्ये करायचा असेल, तर याबाबत ते आयोगाला कळवू शकतात. या विधेयकात १२३ वी सुधारणा असल्याने मत विभाजन करण्यात आले, ज्यामध्ये १५६ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. ३ सदस्यांनी या विधेयकात काही सुधारणा सुचवल्या आहेत, यावर पुढील काळात चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

भाजप सरकार देशाच्या गरीब आणि मागसवर्गीय जनतेचे सरकार आहे, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यावर दिले होते. आज राज्यसभेत या संबंधीच्या विधेयकाला मंजुरी देऊन या सरकारने आपला शब्द पाळला आहे, असेही गहलोत यांनी सांगितले.