ओबीसीमधून मराठा आरक्षण द्या; पुणे मराठा क्रांती मोर्चाची मागणी

906

पुणे, दि. १५ (पीसीबी) – मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकू शकणार नाही, त्यामुळे सरकारने समाजाची दिशाभूल न करता इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण द्यावे,  अशी मागणी पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी आज (गुरूवार) येथे केली.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी कुंजीर म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मोर्चे काढले. त्यानंतर राज्य सरकारने यासाठी एक समिती नियुक्त केली होती. त्या समितीने सरकारला आज अहवाल सादर केला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबतची सर्व कार्यवाही ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचे म्हटले आहे.

यावर आमचा मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास राहीलेला नाही. त्यांनी २५ तारखेपर्यंत निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून संवाद यात्रेस पुण्यातून सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार आहे. २६ तारखेला विधानभवनावर ही यात्रा धडकणार आहे. यादरम्यान,  मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेतल्यास  आणखी तीव्र लढा उभारणार आहे, असा  इशारा त्यांनी यावेळी दिला.