Desh

ओडिशात दहा कापलेले हात सापडल्याने खळबळ

By PCB Author

November 20, 2018

जाजपूर, दि. २० (पीसीबी) – ओडिशातील जाजपूर येथे दहा कापलेले हात सापडल्याची खळबळ उडाली आहे. रविवारी (दि.१८) हा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना समोर आल्यानंतर जाजपूर येथे भीतीचे वातावरण असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २००६ मध्ये कलिंगा नगरमधील स्टिल कारखान्यासाठीच्या जमिन अधिग्रहणाला स्थानिक आदिवासींनी विरोध केला होता आणि त्याविरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात १३ पेक्षा जास्त आदिवासींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले, पण पाच मृतदेहांची ओळख पटली नव्हती. ओळख न पटल्याने त्यांचे हात कापून त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले होते. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आदिवासींच्या कुटुंबियांना मृतदेहांचे हात परत देण्यात आले.

मात्र, त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला आणि या हातांची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. यामुळे ते हात एका मेडिकल बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणी एफआयआर दाखल झालेला नाही. ज्या क्लबमधील मेडिकल बॉक्समध्ये हे हात ठेवण्यात आले होते, त्या क्लबची खिडकी शनिवारी रात्री काही अज्ञातांनी तोडली आणि मेडिकल बॉक्स पळवला. त्यानंतर जाजपूर येथे त्यांनी हा बॉक्स फेकला अशी माहिती ओडिशा पोलिसांनी दिली आहे.