ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून विजय मिळविला

0
225

अ‍ॅडलेड, दि.१९ (पीसीबी) : कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक दिवस-रात्र सामना अडिच दिवसांत संपला. ऑस्ट्रेलियाने गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर आठ गडी राखून विजय मिळविला. तिसऱ्या दिवसात दिवस-रात्र सामना संपण्याची अॅडलेडवरील परंपरा कायम राहिली. तिसऱ्या दिवशी भारताने १ बाद ९ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरवात केली. तेव्हा सामना दिवसाच्या दुसऱ्या सत्रात संपेल असे कुणालाच वाटले नसेल. पण, दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कमिन्सने बुमराला स्वतःच्या गोलंदाजीवर टिपले आणि त्यानंतर जे काही घडले ते समजण्या पलिकडचे होते. कारण पुढच्या ८० चेंडूत भारताचा डाव आटोपला. भारताला चाळिशीही गाठता आली नाही.

कमिन्सने पहिले चार बळी मिळविल्यावर हेझलवूडने भारताचे मोहरे एकामागून एक टिपले. भारतीय फलंदाज त्याचा सामनाच करू शकले नाहित. पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळविलेला भारताचा दुसरा डाव ३६ धावांतच आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अचूक टप्पा राखत भारतीय फलंदाजांना भंडावून सोडले. पोषक वातावरण आणि वेगवान गोलंदाजीस साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर आज भारतीय फलंदाजांच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या.

फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला ऑस्ट्रेलियासमोर ९० धावांचेच आव्हान ठेवता आले. मॅथ्यू वेड आणि ज्यो बर्न्स यांनी ७० धावांची सलामी देत विजयाचा मार्ग सोपा केला. विजयाच्या प्रवासात त्यांनी वेड आणि मार्नस लाबुशेन यांच्या विकेट गमावल्या. पण, बर्न्सने षटकारासह ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना आपले अर्धशतकही पूर्ण केले. पहिली कसोटी आता संपली, दुसऱ्या कसोटीचा विचार भारताला आतापासून करायला लागेल. कारण, दुसऱ्या कसोटीत विराट कोहली नसेल आणि रोहितही उपलब्ध होणार नाही. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी भारताला पुन्हा सामन्यात आणले होते. भारतीय क्षेत्ररक्षणाच्या मर्यादाही उघड झाल्या होत्या. एकामागून एक झेल सोडत त्यांनी ऑस्ट्रेलियाला एका परीने साथच केली होती. तरी गोलंदाजांनी आव्हान कायम राखले होते. तिसऱ्या दिवशी सकाळी भारतीय फलंदाजीच्या मर्यादा उघड झाल्या. आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरताना भारताला या दोन्ही अपयशाच्या आघाडीवर नव्याने विचार करावा लागणार आहे.

संक्षिप्त धावफलक – भारत २४४ आणि ३६ (जोश हेझलवूड ५-८, पॅट कमिन्स ४-२१) वि.वि. ऑस्ट्रेलिया १९१ आणि २ बाद ९३ (ज्यो बर्न्स नाबाद ५१, मॅथ्यू वेड ३३, स्टिव स्मिथ नाबाद १)

कसोटीत प्रथमच…

भारताची कसोटी क्रिकेटमधील (३६) सर्वात निच्चांकी धावसंख्या धावसंख्या. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध ४२ (१९७४)
कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच सर्व अकरा फलंदाज आणि अवांतर धावा दोन आकड्यात पोहचू शकल्या नाहीत -सहा गडी गमावल्यावर १९ धावा ही भारताची आतापर्यंतची निच्चांकी. यापूर्वी ६ बाद २५
कसोटी सामन्यात पाच गडी बाद करण्याठी हेझलवूडचे केवळ २५ चेंडू. यामधील विक्रम ऑस्ट्रेलियाच्या एरिन टोशॅकचा १९४७-४८ मध्ये भारताविरुद्ध, त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडची २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बरोबरी
पॅट कमिन्सच्या ३१ सामन्यात १५० विकेटस, अशी वेगवान कामगिरी यापूर्वी डेनिस लिली, शेन वॉर्न आणि स्टुअर्ट मॅकगिल यांची तेवढ्याच सामन्यात