Sports

ऑलिंपिकला जपानी नागरिकांचा विरोध

By PCB Author

April 14, 2021

टोकियो, दि.१४ (पीसीबी) : कोविड १९चा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असला, तरी ऑलिंपिक घेण्याचा चंग बांधलेल्या जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला आज धक्का बसला. ऑलिंपिकला अवघे १०० दिवस बाकी असताना जपानच्या क्योडो न्यूज संस्थेने घेतलेल्या एका अहवालात जपानच्या ७० टक्के जनतेने ऑलिंपिक घेण्यास विरोध केला आहे. एक तर पुढे ढकला किंवा रद्द करा असे मत नागरिंकानी मांडले आहे.

या सर्वेक्षणात ३९.२ टक्के जनतेने स्पर्धा रद्द करावी असे मत मांडले आहे. त्याचवेळी ३२.८ टक्के जनता मात्र स्पर्धा पुन्हा पुढे ढकलावी असे म्हणत आहे. केवळ २४.५ टक्के जनता स्पर्धा व्हायला हव्यात असे म्हणत आहे.

जपानमध्ये कोविड १९ची चौथी लाट आली आहे. त्यापासून वाचण्यासाठी जपान सरकार एक महिन्याची आणीबाणी जाहिर करण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशात लसीकरण मोहिम १२० ठिकाणी सुरू करण्यात आली असून, केवळ ६५ आणि ६५ वर्षापुढील नागरिकांनीच ती दिली जाणार आहे. कोविडची चौथी लाट थोपविण्यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करू असे जपान सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, लसीकरणाबाबत जपान सरकार गंभीर नसल्याचेच जनतेचे मत आहे. या सर्वेक्षणात तब्बल ६० टक्के जनतेने सरकारचे लक्ष नसल्याचे म्हटले आहे.

एकूणच ऑलिंपिकवर असणारे कोविड १९ चे संकट अजून टळलेले नाही आणि आयोजनाबाबत अजूनही खात्री नाही. अर्थात, ऑलिंपिक पात्रतेसाठी खेळाडू कौशल्य पणाला लावत आहेत. जेणेकरून स्पर्धा झाल्यास आपण कमी पडायला नको असा विचार खेळाडू करत आहेत. मात्र, अनेक खेळाडूंच्या मनात ऑलिंपिक होण्याबाबत भिती डोकावत आहेत. खेळाडूच आले नाहीत, तर स्पर्धा कशी होणार असा प्रश्न अनेक खेळाडू उपस्थित करत आहेत.