ऑपरेटर नेमून आधार केंद्र सुरू करण्याची मागणी

0
489

– माजी महापौर नितीन काळजे यांनी लक्ष वेधले
– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी, दि.२२ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवडमध्ये केंद्र सरकारकडून बसवण्यात आलेल्या आधार कार्ड मशीन्सवर ऑपरेटर नेमून केंद्र कार्यान्वित करावीत, अशी मागणी माजी महापौर तथा नगरसेवक नितीन काळजे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, एकीकडे कोणत्याही शैक्षणिक, तसेच शासकीय कामांसाठी विद्यार्थ्यांना आधार नोंदणी सक्तीचे झाले आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरातील दोन उन्नत केंद्रावर केंद्र शासनाकडून बसविण्यात आलेल्या आधारकार्ड मशीन्सवर शासनाने अद्याप ऑपरेटर दिला नसल्याने विद्यार्थी आधारकार्ड काढण्याचे काम बंद आहे. त्यामुळे सुमारे दीड लाख विद्यार्थी आधारविना आहेत.

शहरातील सर्व खासगी व मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याची जबाबदारी महापालिकेला देण्यात आली आहे. यासाठी आकुर्डी व पिंपरी या दोन उन्नत केंद्रावर शासनाकडून प्रत्येकी दोन – दोन मशीन बसविण्यात आल्या आहेत. आधारकार्ड काढण्यासाठी शासनाकडील कर्मचारी नेमण्यात आले होते. ऑपरेटरकडून प्रत्येक शाळेला नंबर देण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक शाळेतील २५ ते ३० विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून दिले जात होते. परंतू करोनाकाळात शाळा बंद होत्या. मशीन चालविणारे ऑपरेटर यांना करोनाची लागण झाली. त्यानंतर शासनाने आधारकार्ड काढण्यासाठी ऑपरेटर दिलेच नाहीत. आता ऑपरेटर विना आधारकार्ड काढता येत नाहीत.
पिंपरी -चिंचवड महापालिका क्षेत्रातील महापालिका व खासगी शाळांमध्ये जवळपास ३ लाख ४९ हजार ९५४ विद्यार्थी आहेत. त्यापैकी २ लाख २५ हजार ८५३ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यात आले आहे तर जवळपास १ लाख २३ हजार १०१ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काम लॉकडाऊनमुळे रखडले आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होवून दीड महिने होवूनही आधारकार्डचे काम बंद आहे.

दहावीची परीक्षा अर्ज, शिष्यवृत्ती, डीबीटी योजना, शालेय पोषण आहार रक्कम आदींसाठी बँक खाते उघडण्यासाठी आधार क्रमांक द्यावा लागतो. ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप आधारकार्ड नाही त्यांचे पालक व शिक्षकांना शैक्षणिक कामे करताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या विद्यार्थ्यांचे जवळपास ७० टक्के आधार कार्ड नोंदणीचे काम झालेले आहे. परंतु खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे काम ऑपरेटर नसल्यामुळे थांबले आहे. याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ हे केंद्र ऑपरेटर नियुक्त करून सुरू करावे, अशी आमची आग्रही मागणीही माजी महापौर नितीन काळजे यांनी केली आहे.