ऑक्सिजन अभावी चार दिवसांत ७४ कोरोना रुग्णांचा ‘या’ राज्यात मृत्यू

0
380

गोवा, दि. १४ (पीसीबी) – देशात कोरोनाच्या संकटात आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. त्यातच ऑक्सिजन अभावी अनेकांचे जीव जात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात अशा घटना घडल्या असताना देखील प्रशासनाला शहाणपणा सुचलेला दिसत नाही. कारण पुन्हा एकदा गोव्यात मृत्यूने तांडव घातला आहे. गोव्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये काल मध्यरात्री 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांत याच रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यातूनच स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. मंगळवारी 26, बुधवारी 20, गुरुवारी 15 आणि आज 13 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गोवा सरकारने मेडिकल कॉलेजमधील ऑक्सिजन पुरवठ्याच्या प्रश्नावर समितीची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, रुग्णालयांना केल्या जाणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीला देण्यात आली आहे. याशिवाय समोर येणाऱ्या अडचणींवर तातडीनं मार्ग काढण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवसांत समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.