Desh

‘ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशांत एकाही मृत्यूची नोंद नाही’. केंद्राच्या या दाव्यावर राऊतांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…

By PCB Author

July 21, 2021

नवी दिल्ली,, दि.२१ (पीसीबी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घेतलं होत. आता ती लाट ओसरताना दिसून येत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलं आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या एकाही घटनेची नोंद झालेली नाही अशी माहिती केंद्राकडून राज्यसभेत देण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने केलेल्या या दाव्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चीड व्यक्त करत ‘बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे’, असा टोला त्यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले कि, “ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मरण पावले, जे ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स घेऊन धावत होते, त्यांचा यावर विश्वास बसतो का हे सांगायला हवं. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असो किंवा मौखिक; सरकार सत्यापासून पळत आहे. बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे.” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

पहिल्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची मागणी ३,०९५ मेट्रिक टन एवढी वाढली. त्यानंतर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी ९,००० मेट्रिक टन पर्यंत पोहोचली. त्यामुळे केंद्राला राज्यांमध्ये समान वितरणाची सोय करावी लागली असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभेत सांगितले.  राज्यसभेत निवेदन देताना केंद्राने सांगितलं की, आरोग्य हा राज्य सरकारचा विषय आहे. तपशीलवार मार्गदर्शक सूचनांनुसार करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूची आकडेवारी नियमितपणे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे दिली जाते. दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -१९ रूग्णांचा मृत्यू झाला का या प्रश्नाच्या उत्तरावर आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी उत्तर दिले. “आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे बाधितांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या केंद्राकडे नोंदवतात.”

“केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपासून स्वतंत्रपणे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही,” असं लेखी उत्तरात सांगण्यात आलं.