ऐश्वर्या रॉय-बच्चनचे मीम पोस्ट करून माझं काय चुकलं?; विवेक ओबेरॉयचा उद्दामपणा

0
736

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्या राय-बच्चनवरील आक्षेपार्ह मीम ट्विटरवर पोस्ट केल्याने अभिनेता विवेक ओबेरॉयला राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली असताना विवेकने मात्र मी काहीच चुकीचं केलंलं नाही, असं म्हटलं आहे. मी माफी मागावी, अशी काहींची मागणी आहे. माझी त्यावर काहीच हरकत नाही. मी माफी मागायलाही तयार आहे पण त्याआधी माझी चूक काय झाली, हे मला सांगायला हवे, असे विवेक ओबेरॉय म्हणाला.

कुणीतरी हा मीम बनवला आणि तो पाहून मला हसू फुटलं. मी त्याच्या कल्पकतेला दाद दिली. ही गोष्ट इतकी गांभीर्याने घेण्याची गरजच काय? कुणीही विनाकारण त्यावर गहजब करू नये. मीममध्ये जे दिसत आहेत त्यांनी काहीच हरकत घेतलेली नसताना भलतेच त्यावर आक्षेप का घेत आहेत?, असा प्रश्न विवेकने विचारला.

विवेककडे राज्य तसेच केंद्रीय महिला आयोगाने याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. त्याबाबत विचारले असता, महिला आयोगाची कोणतीही नोटीस मला अद्याप मिळालेली नाही. मी त्याचीच वाट पाहात आहे. मी नक्कीच आयोगापुढे जाईन आणि माझी काहीही चूक नसल्याचे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन, असे विवेक म्हणाला.

कलाकारांनी व्यक्त केली नाराजी

विवेक ओबेरॉयच्या या ट्विटवर बॉलिवूडमधूनही नाराजीचे सूर उमटत आहेत. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी नाराजी व्यक्त करत लिहिले की, ‘विवेक, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. ट्रोल्स कोणत्याही थराला जाऊ दे, पण तू एक जबाबदार कलाकार आहेस. एखाद्याची प्रतिमा तुझ्यामुळे मलीन होणं योग्य नाही. तू माफी मागितली पाहिजे आणि ट्विटही डिलीट केलं पाहिजे.’

स्त्रीवादाचा पुरस्कार करणारी अभिनेत्री सोनम कपूरनंही विवेकवर टीकास्त्र डागलाय. ‘तुझं कृत्य दर्जाहीन आणि घृणास्पद आहे. ‘ असं ती म्हणालीय.

सोनम कपूरला दिला ‘हा’ सल्ला

अभिनेत्री सोनम कपूरने विवेक ओबेरॉयची कृती किळस आणणारी असल्याचा संताप ट्वीटरवरून व्यक्त केला आहे. त्याबाबत विचारले असता, सोनमने सोशल मीडियावर ‘ओव्हर रिअॅक्ट’ होऊ नये, असा सल्ला विवेकने दिला. मी गेली १० वर्षे महिला सशक्तीकरणासाठी काम करत आहे आणि सोनम मात्र स्वत:च्या मेकओव्हरपलीकडे गेलेली नाही, असा टोलाही विवेकने लगावला.