ऐन सणासुदीच्या तोंडावर लोडशेडिंग; तोडफोड झाल्यास प्रशासन जबाबदार असेल

0
446

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात भारनियमनाच संकट आहे. चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्याने, तात्पुरत्या स्वरुपाचे भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. सध्या राज्यात  ४०० ते ५०० मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे.  सेंट्रल ग्रीडमध्ये वीज महाग झाली आहे. इतर राज्यांनी अधिकच्या किंमतीने वीज विकत घेतली आहे, त्यामुळे वीज उपलब्ध नाही. परिणामी लोडशेडिंग सुरु झाले आहे.  ठाण्याजवळ मुंब्रा, दिवा भागात चार तास लोडशेडिंग आहे.

G1, G2 आणि G3 या तीन गटात ३ ते ४ तासांचे भारनियमन लागू करण्यात आले आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, मुंब्रा, भिवंडी, नाशिक या परिसरात लोडशेडिंग होत आहे.  ऑक्टोबर हिट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीत वाढ आहे. त्यामुळे त्याप्रमाणात वीजनिर्मिती होत नसल्याने आता भारनियमन लागू झाले आहे.

लोडशेडिंगवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायदा हातात घेण्याची भाषा केली आहे. मुंब्र्यात आठ ते नऊ तास लोडशेडिंगनंतरही वीज नसल्याने, जाळपोळ आणि तोडफोड झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाडांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.