ऐन निवडणुकीत दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयावर प्राप्तिकर विभागाचा छापा    

0
407

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – नवी दिल्लीतील २४, अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयातील लेखा विभागाच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापा  टाकून कार्यालयाला टाळे लावले. तसेच  या विभागात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पाच पगारदार कर्मचाऱ्यांच्या घरीही छापे टाकले आहेत. महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात असलेल्या काँग्रेसला या कारवाईमुळे  धक्का बसला आहे.  

मॅथ्यू वर्गीस यांच्यासह चार कर्मचाऱ्यांच्या घरी छापा टाकला आहे. वर्गीस गेल्या चार दशकांपासून काँग्रेसच्या लेखा विभागात कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांकडे जाऊन प्राप्तिकर अधिकारी विचारपूस करीत आहेत. त्याच वेळी काँग्रेसच्या लेखा विभागालाही प्राप्तिकर खात्याने टाळे ठोकले आहेत, अशी   माहिती काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी दिली.

आनंद शर्मा म्हणाले की,  निवडणुकीच्या काळात पक्षाच्या प्रचारासाठी आणि उमेदवारांसाठी लागणारा निधीही खर्च करण्यापासून काँग्रेस पक्षाला रोखले जात आहे. पाच वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने छापे घालण्यात येत आहेत.  हे सरकार राजकीय सूडबुद्धीने काम करत आहे.  या कारवाई विरोधात काँग्रेस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार  आहे, असे त्यांनी सांगितले.