Desh

ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपाला मोठा झटका बसला

By PCB Author

January 11, 2022

लखनऊ, दि. ११ (पीसीबी) – दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशात ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रचार मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. पक्षाकडून राज्यात पुन्हा एकदा मोठा विजय मिळवण्याच्या घोषणा करण्यात आल्या असतानाच ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपाला मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात असलेले ज्येष्ठ मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. खुद्द सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यासंदर्भात ट्वीटरवर माहिती दिली आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे मुळात २०१६मध्ये बहुजन समाज पक्षातून भाजपामध्ये आले होते. पण आता त्यांनी भाजपाला रामराम करत समाजवाजी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कन्या संघमित्रा मौर्य या अजूनही भाजपाच्या खासदार आहेत. त्यांच्याविषयी अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. अखिलेश यादव म्हणतात… “सामाजिक न्याय आणि समता-सामनतेचा लढा देणारे स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं सपामध्ये स्वागत आहे. सामाजिक न्याय का इन्कलाब होगा, बाईस में बदलाव होगा”, असं ट्वीट अखिलेश यादव यांनी केलं आहे. मी आंबेडकरी विचारांचा.. दरम्यान, भाजपासा सोडण्याचं कारण पक्षात काम करताना होत असलेल्या त्रासामध्ये असल्याचं स्वामी प्रसाद मौर्य यांनी सांगितलं आहे. “गेली पाच वर्ष मी यांची विचारसरणी पाहिली आहे. मी आंबेडकर विचारसरणीचा आहे. आंबेडकर विचारसरणीच्या एका व्यक्तीला भाजपामध्ये ५ वर्ष काम करावं लागताना जे सहन करावं लागलं, त्या माझ्या वेदना आहेत”, स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले आहेत. डझनभर आमदारही भाजपा सोडणार? दरम्यान, माध्यमांशी बोलताना स्वामी प्रसाद मौर्य यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. “तीन आमदार नाही, अजून चर्चा होऊ द्या, डझनभर आमदार राजीनामा देतील. तुम्ही पाहात राहा. पुढचे वार आणि धार पाहात राहा. एक-दोन दिवसांमध्ये त्याविषयी मी घोषणा करेन”, असं स्वामी प्रसाद मौर्य यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.