ऐन गणेशोत्सवात खड्डे खोदाई नको म्हणून आंदोलन

0
187

– नगरसेविका आशा शेंडगे यांचा महापालिका प्रशासना विरुद्ध आक्रमक पवित्रा, आयुक्तांच्या फलकाला काळे फासले, अभियंत्याच्या खुर्चीची पूजा

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – भर पावसाळ्यातील रस्ते खोदाईमुळे पिपंरी चिंचवडकर जाम त्रस्त आहेत. अशाच पद्धतीने गणेशोत्सव सुरू होत असताना आता कासरवाडी येथे रस्ते खोदाई सुरू झाल्याने त्याला स्थानिक नगरसेविका आशा शेंडगे यांनी अत्यंत कडवा विरोध दर्शविला. महापालिका प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने त्यांनी आयुक्त कक्षा बाहेर घोषणा देत आयुक्तांच्या फलकाला काळे फासून आंदोलन केले. बीआरटीचे कार्यकारी अभियंता अशोक भालकर यांना वारंवार सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले म्हणून त्यांच्या कक्षात त्यांच्या अनुपस्थित खुर्चीला फुले वाहून पूजा करत बथ्थड प्रशासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, या प्रकाराने हादरलेल्या प्रशासनाने तत्काळ पोलिसांना पाचारण केले आणि नगरसेविका शेंडगे यांच्यासह १२ जणांना ताब्यात घेतले आहे.

आशा शेंडगे म्हणाल्या, आता उद्या पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. अशात कासारवाडी परिसरात खड्डे खोदाईची कामे सुरू केली.उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की पावसाळा आणि गणेशोत्सवात खोदाईची कामे करू नयेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होईल म्हणून उत्सव संपल्यानंतर ही कामे सुरू करा, अशी आपली आग्रही मागणी होती. महापालिकेचे अभियंता अशोक भालकर यांना त्याबाबत दोन-तीन वेळा सांगितले. मी भेटतो, बोलतो असे म्हणत त्यांनी टाळाटाळ केली. इकडे खड्डेखोदाई सुरू केल्याने लोक त्रेस्त आहेत. अखेर आज भालकर यांना त्यांच्या कक्षात भेटायला आम्ही गेलो. आम्हाला वेळ देऊनही ते जागेवर उपस्थित नव्हते. अखेर आम्ही त्यांच्या खुर्चीला फुले वाहून पूजा केली आणि घोषणा दिल्या. त्यांच्या नामफलकाला काळेही फासले. याच दरम्यान आमच्या मागणीची दखल प्रशासन घेत नसल्याने आयुक्त राजेश पाटील यांच्या कक्षाबाहेर आम्ही धरणे आंदोलन केले आणि घोषणा दिल्या. आयुक्त कक्षात असूनही त्यांनी दखल घेतली नाही. ते बाहेर निघाले त्यावेळी त्यांना आपले मत सांगण्याचा प्रयत्न केला असता, मला वेळ नाही असा धोशा त्यांनी लावला. या दरम्यान, कक्षात चर्चा करू म्हणून त्यांनी आग्रह धरला. कार्यकर्त्यांचा आग्रह इथेच एकून घ्या, असा होता. याच काळात कोणीतरी आयुक्तांच्या फलकावर काळे फासण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांच्या शर्टलाही काळा डाग लागला.

दरम्यान, पोलिसांचा मोठा ताफा आला आणि आंदोलकांची धरपकड झाली. आशा शेंडगे यांच्यासह ८ महिला आणि ३ पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गतवर्षी अशाच पद्धतीने एन सणासुदिच्या काळात कासारवाडीत खड्डे खोदाई सुरू करण्यात आली होती. त्यावेळीसुध्दा नगरसेविका आशा शेंडगे यांनी लोकांची बाजू लावून धरली आणि पावसाळा, सणसूद सोडून ही कामे करा, अशी मागणी केली होती