Maharashtra

एसटी संपाला राज्यात हिंसक वळण

By PCB Author

June 08, 2018

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काल मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाला राज्याच्या काही भागात हिंसक वळण लागले आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात दोन एसटी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. भोसी पाटीजवळ दगड मारून एका एसटी बसची काच फोडण्यात आली. हदगावला जाणाऱ्या एसटीवरही दगडफेक करण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये तीन एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रत्नागिरीमध्ये संपाचा परिणाम जाणवला नसला तरी पंढरपूरमध्ये भाविक अडकून पडले आहेत. पालघर जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या एसटीच्या २६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अहमदनगरमध्ये १० आगरातील वाहतूक बंद आहे तर सिंधुदुर्गात सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाल्याने एसटी वाहतूक ठप्प झाली आहे.

राज्यात एकूण १७ हजार एसटी असून दरररोज ७० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. कुठल्याही अधिकृत संघटनेने पुकारलेला संप नसून कर्मचाऱ्यांनी तो उत्स्फुर्तपणे पुकारला आहे. भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे येथे मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे येथील स्थानकांत बसेस उभ्या आहेत. राज्यातील अनेक भागात एसटी सेवा सुरळीत सुरु असली तरी काही संघटनांच्या दाव्यानुसार या संपाला उत्स्फुर्त प्रतिसाद असल्याचे सांगण्यात येत आहे. मोबाईलवरील संदेशांमार्फत आणि पत्रकांमार्फत या संपाची माहिती पसरवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत.