Pimpri

एसटी बस प्रवासादरम्यान प्रवासी महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

By PCB Author

May 01, 2022

पिंपरी दि. १(पीसीबी) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करत असलेल्या एका महिलेचे दोन लाख 51 हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी 9 ते दुपारी चार वाजताच्या कालावधीत श्रीरामपूर ते संत तुकाराम नगर पिंपरी या दरम्यान घडली.

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी (दि. 27) श्रीरामपूर ते संत तुकाराम नगर पिंपरी या मार्गावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करत होत्या. बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बॅगेतील दोन लाख 51 हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार संत तुकारामनगर, पिंपरी येथे आल्यानंतर उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.