“एसटीच्या महिला कर्मचारी परिवहन मंत्री अनिल परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार”

0
232

मुंबई, दि.२० (पीसीबी) : ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेलं एसटी कर्मचारी आंदोलन अजूनही सुरुच आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मागील 11 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. मात्र, सरकारकडून अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीकडे लक्ष दिलं जात नाही. अशावेळी गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनाची आजची दिशा जाहीर केली. एसटीच्या महिला कर्मचारी दुपारी चार वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर जात परबांची साडी-चोळी आणि नारळाने ओटी भरणार असल्याचं पडळकरांनी सांगितलं.

पडळकर यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकार म्हणतं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन नेतृत्वहीन झालंय, आम्ही बोलायचं कुणाशी. अरे इथं तुमचे हजारो बाप आणि आया बसल्या आहेत, त्यांच्याशी येऊन बोला ना’, असा घणाघात पडळकर यांनी केलाय. आंदोलकांशी चर्चा करायची सोडून राज्य सरकार चॅनलच्या माध्यमातून दररोज नवनवीन गोष्टी सांगत आहे, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे. ‘आम्ही तुम्हाला फक्त विलिनीकरण करा असं म्हणत नाही. तर पर्यायही देत आहोत. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला पर्याय दिला आणि जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळतं तेच एसटी कर्मचाऱ्यांना कसं मिळू शकतं हे सांगितलं. आम्ही फक्त बोलत नाही. राज्य सरकारच्या तिजोरीतून या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या 7 तारखेला झाले पाहिजेत. एक दिवसही पुढे गेला नाही पाहिजे. तुम्ही आम्हाला राज्य सरकारमध्ये घेऊ शकता. हे एसटी कर्मचारी पैसे आणून देतात. तेच पैसे भ्रष्टाचारात जातात. तो भ्रष्टाचार थांबवला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार इतर महामंडळांपेक्षा दुप्पट होऊ शकतो’, असा दावा करत पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय.

अनिल परब यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना एसटी कर्मचारी आंदोलनावरुन भाजपवर टीका केली. बैठकीत एसटी रुळावर आणण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला. संबंधित कंपनीला सूचना दिल्या आहेत. एसटीच्या खासगीकरणाचा विचार नाही. तो एक पर्यात आहे. विलिनीकरणाबाबतचा निर्णय समितीच घेईल, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. तसंच चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना ते युनियनचे ऐकतात ना भाजप नेत्यांचं. हे आंदोलन आता नेतृत्वहीन झालंय. कामगारांनी सांगावं कुणाशी चर्चा करायची. आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार आहोत, असंही परब म्हणाले.