एरंडोल च्या लग्न सोहळ्यामुळे १६ कोरोना बाधित

0
484

जळगाव, दि. २७ (पीसीबी) – कोरोना प्रसार खूपच वेगात असल्याने लग्न अथवा अन्य सोहळे करताना बंधने पाळा, असे वारंवार सांगूनही लोक ऐकत नसल्याने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागलेत. पनवेल येथील हळद व लग्न सोहळ्यात तब्बल ९० वऱ्हाडी कोरोना बाधित निघाल्याने खळबळ आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील विखरण गावात असाच प्रकार झाला. कोरोना प्रसार टाळण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंन्सिंग पाळा हे सांगूनही लोकांनी ऐकले नाही आणि वधू वरासह १६ वऱ्हाडी कोरोना बाधित झाले. या सर्वाना कोविड केअर केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणा संयोजकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

विखरण येथे आयोजित विवाह सोहळ्यात नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती प्रांत कार्यालयास मिळाली. त्यामुळे अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी पोहचून तपासणी सुरू केली. २० जणांना करोनाची लक्षणे असल्याच्या संशयावरून विलगीकरणात ठेवण्यात आले. नवरदेवाचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आल्यावर तो सकारात्मक आला. त्यामुळे इतर १९ जणांचेही नमुने घेण्यात आले. त्यापैकी १६ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात वधू तसेच वर आणि वधू दोघांच्या आई-वडिलांचा समावेश आहे. विवाह, सार्वजनिक कार्यक्रम, अंत्यविधी अशा ठिकाणी गर्दी न करता शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.

सध्या नवदाम्पत्य कोविड केंद्रात उपचार घेत आहेत. रूग्णांपैकी एक व्यक्ती खर्ची या गावचा असल्याने त्याच्या संपर्कातील १२ जणांचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.