Desh

एमीसॅट उपग्रहासह २८ नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; इस्रोची ऐतिहासिक कामगिरी

By PCB Author

April 01, 2019

श्रीहरिकोटा, दि. १ (पीसीबी) – भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) कौतुकास्पद कामगिरी करून  आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे २८ नॅनो उपग्रहांचे आज ( सोमवारी)  श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

एमीसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवून ऐतिहासिक कामगिरी ‘इस्रो’ने   केली आहे. सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपक एमीसॅट व २८ नॅनो उपग्रहांना घेऊन  अवकाशात  झेपावले.  पीएसएलव्ही प्रक्षेपकाने चांद्रयान २००८ व मंगळ ऑर्बिटर २०१३ या दोन्ही मोहिमांत मोठी भूमिका  निभावली होती. यात अमेरिकेतील २४, लिथुआनियातील ११ ,स्पेनमधील १ तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे.

इस्रो’ची ही ४७ वी पीएसएलव्ही मोहीम  आहे. आजची मोहीम चार टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. एमीसॅट उपग्रह हा विद्युत चुंबकीय मापनासाठी काम करणार आहे. प्रक्षेपक अंतराळात ७४९ किमीवर एमीसॅट उपग्रह सोडेल आणि ५०४ किमी ऑर्बिटमध्ये इतर उपग्रहांना प्रक्षेपित करणार आहे.