एमपीएससी परीक्षांसाठी आता बायोमेट्रिक हजेरी; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय

0
788

आता महाराष्ट लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तोतया विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एमपीएससीच्या सर्व परीक्षांसाठी यापुढे बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षेला तोतया विद्यार्थी बसवून अनेकांनी प्रशासनात उच्च पदाच्या जागा पटकावल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

विविध शासकीय पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेण्यात येतात. मात्र आपल्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला परीक्षेला बसवून अ श्रेणीच्या पदांवर विराजमान झालेले अनेक अधिकारी प्रशासनात अद्याप कार्यरत आहेत. राज्य प्रशासनातील जवळपास ५० अधिकाऱ्यांनी तोतयांच्या जिवावर पदे मिळवल्याचे तपासात समोर आले आहे. ही तोतयोगिरी समोर आल्यानंतर आता आयोगालाही जाग आली आहे.

त्यामुळे यापुढे परीक्षांसाठी बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी उमेदवारांकडूनही बायोमेट्रिक हजेरी आणि परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसविण्याची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी काही परीक्षांसाठी मोबाईल जॅमर बसविण्याचा प्रयोग आयोगाने केला आहे. बायोमेट्रिक हजेरीसाठी उमेदवारांचे आधार क्रमांक आणि त्यावरील बोटाचे ठसे यांच्या आधारे ही हजेरी घेण्यात येईल. परीक्षेचा अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना आधार क्रमांक नोंदवणे सक्तीचे असल्याची सूचना आयोगाने यापूर्वीच दिली आहे. बायोमेट्रिक हजेरीसाठी विविध कंपन्यांकडून प्रस्तावही मागवण्यात आल्याचे आयोगातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.