एमआयएमच्या सय्यद मतीनला औरंगाबाद महापालिका सभागृहात पुन्हा प्रवेश नाकारला; नगरसेवकांकडून खुर्च्यांची तोडफोड

0
983

औरंगाबाद, दि. १ (पीसीबी) – भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल गैरउद्गार काढणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा प्रवेश नाकारण्यात आला. मतीनला सभागृहात प्रवेश देण्यास भाजप नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. दुसरीकडे मतीनवरील कारवाई रद्द करण्याच्या मागणीसाठी एमआयएम नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे महापौरांनी १५ नगरसेवकांचे सदस्यत्व एक दिवसासाठी रद्द केले.

औरंगाबाद महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. १) आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरूवातीलाच भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याला सर्वसाधारण सभेत प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. त्याला एमआयएम व काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सभागृहात त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असताना एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याने गैरउद्गार काढले होते. त्यावरून भाजप नगरसेवकांनी मतीनला मारहाणही केली होती. मारहाण केलेल्या भाजप नगरसेवकांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृहात केली. महापौरांनी मतीनला सभागृहात प्रवेश न देण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. महापौरांनी १५ नगरसेवकांचे सदस्यत्व एक दिवसासाठी रद्द केले. त्यानंतर सभागृहाबाहेर पडणाऱ्या नगरसेवकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. त्यामुळे सभागृहाबाहेर काही काळ तणाव निर्माण झाला होता.