‘एफटीआयआय’ अध्यक्षपदाचा अनुपम खेर यांचा राजीनामा  

0
914

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आज (बुधवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. व्यस्त वेळापत्रकामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मान होता, असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

११ ऑक्टोबर २०१७ रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, भाजपच्या जवळ असलेल्या व्यक्तींचीच या पदावर नियुक्ती होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. दरम्यान, पदभार स्वीकारल्याच्या वर्षभरातच  खेर यांनी राजीनामा दिल्याने शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विनंतीनंतर मी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यावेळीच माझ्या सहा महिन्यांच्या अमेरिका दौऱ्याची कल्पना दिली होती. अमेरिकेत एका आंतरराष्ट्रीय टीव्ही शोच्या चित्रीकरणासाठी मी तिथे जाणार आहे. त्यामुळे २०१८ ते २०१९ या कालावधीत जवळपास नऊ महिने मी परदेशात असणार आहे. त्यामुळे मला अध्यक्षपदावर काम करता येणार नाही. हा विद्यार्थ्यांवर एकप्रकारचा अन्याय होईल. म्हणून मी राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.