एनआरसी अंतर्गत एकाही हिंदू व्यक्तिला देश सोडावा लागणार नाही- मोहन भागवत

0
406

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – एनआरसी अंतर्गत एकाही हिंदू व्यक्तीला देश सोडावा लागणार नाही असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्या दरम्यान एक बैठक पार पडली. या बैठकीत जेव्हा एनआरसी चा मुद्दा मांडण्यात आला त्यावेळी मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले. “एनआरसी अंतर्गत एकाही हिंदू व्यक्तीला देश सोडावा लागणार नाही. ज्या हिंदूंचे इतर देशांमध्ये शोषण झाले आहे जे मायदेशी परतले आहेत असेही हिंदू भारतात राहू शकतात” असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले.

मोहन भागवत हे १९ सप्टेंबर पासून कोलकाता येथे आहेत. दोन दिवसांच्या प्रदीर्घ बैठकीसाठी ते आले आहेत. रविवारी झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी हिंदूंना देश सोडवा लागणार नाही असे वक्तव्य केले आहे. दरम्यान या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये आधी टॅक्सी आल्या आणि त्यानंतर एनआरसी आले. मात्र या राज्यातल्या हिंदूंनी चिंता करण्याची आवश्यकता नाही असेही बैठकीला उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

आसाममध्ये एनआरसीच्या अंतिम यादीतून १९ लाख ६० हजार लोकांची नावे गायब आहेत. यामध्ये १२ लाख हिंदू आणि बंगाली हिंदूंचा समावेश आहे. या सगळ्या प्रकरणावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टीका केली आहे. एनआरसीची अंमलबजावणी करणे हे भगव्या दलाचे बंगाल विरोधी पाऊल आहे असे त्यांनी म्हटले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चटर्जी यांनीही याप्रकरणी टीका केली आहे. “आसाम एनआरसीमधून १२ लाख बंगाली आणि हिंदूंची नावे गायब होणं हे कशाचं प्रतीक आहे? यावरुन हेच दिसून येते की एनआरसी लादून बंगाली लोकांना आपले हत्यार म्हणून भाजपा वापरत आहे. भाजपा हा पक्ष स्वतःला हिंदूंचे रक्षक मानतो. मग एनआरसीतून १२ लाख हिंदूंची नावे गायब कशी काय झाली? या प्रश्नाचे उत्तर भाजपाने द्यायला हवे” असेही चटर्जी यांनी म्हटले आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी एकाही हिंदूला एनआरसी अंतर्गत देश सोडावा लागणार नाही असे वक्तव्य केले आहे.