एग्झिट पोल पाहून मुळीच चिंता वाटली नाही- शरद पवार

0
431

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – एग्झिट पोल पाहून मुळीच अस्वस्थ झालो नाही किंवा मला चिंता वाटली नाही. कारण मला ग्राऊंड लेव्हलची स्थिती माहित होती त्यामुळे वेगळे चित्र दिसेल याची खात्री मला होती असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. राज्यात वेगळे चित्र दिसेल हा तरुणाईच्या मनातला कौल होता. निवडणूक प्रचाराच्या आधीपासून मी महाराष्ट्रात फिरतो आहे. वास्तव चित्र दाखवण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांनीही पाळली नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही मते मांडली आहेत.

जे सोडून गेले त्यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सत्ताधारी पक्षांमध्ये गेले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच सातारा आणि परळी हे निकाल धक्कादायक होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे. मात्र हे निकाल पाहून मला काहीही आश्चर्य वाटले नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. भाजपाने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली असली तरीही शिवसेनेच्या जागा कमी कशा होतील हे भाजपाने पाहिले. तसेच त्यांच्या संपर्कात १५ अपक्ष असतील तर काही आश्चर्य वाटत नाही असेही शरद पवार म्हणाले.

कलम ३७०, समोर कुणीही दिसत नाही अशी चर्चा निवडणूक प्रचारात केली जात होती. मात्र जनतेच्या मनात वेगळे होते. तरुणाईला बदल हवा होता. निवडणुकीच्या काळात प्रचार करण्यापूर्वी मी महाराष्ट्रात फिरत होतो. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यामुळे जनता चिंतित आहे हे मला समजले होते असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत एका बाजूने एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी प्रचार करत होतो. मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते आमच्या बरोबरीने मेहनत करत होते. हे यश त्यांना आमच्यामुळेच मिळाले आहे असे मी म्हणणार नाही असेही शरद पवार म्हणाले.