“एखाद्याच्या घरी चौकशी करणे हे ठीक आहे, परंतु …” गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

0
403

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी कार्यक्रमा निमित्त ते आले होते.

“केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या एजन्सीजचा आणि सत्तेचा वापर हा राजकीय कारणासाठी करत आहे. यापूर्वीच्या काळात राजकारणात कधीही अशी परिस्थिती पाहिलेली नव्हती. एखाद्याच्यी घरी चौकशी करणे हे ठीक आहे, परंतु त्याच्या सगळ्याच नातेवाईकांच्या घरी देखील, जाणं आणि त्रास देणं हे काही बरोबर नाही.” असं गृहमंत्री दिलीप वळेस पाटील बोलेले आहेत.

तसेच, “किरण गोसावी बद्दल बोलताना गृहमंत्री म्हणाले की, “हा पोलिसांच्या तपासाचा एक भाग आहे. त्यामुळे त्या संदर्भात मी काही बोलणं उचित नाही. परंतु, एक गोष्ट खरी आहे की एनसीबीने कारवाई करताना जे साक्षीदार म्हणून किंवा पंच म्हणून ज्या लोकांना बरोबर नेलं, ते एका पक्षाचे राजकीय कार्यकर्ते आहेत आणि जो गोसावी आहे तो मला वाटतं पुण्याचा फरासखानी पोलीस स्टेशनच्या एका केसमध्ये एक फरार आरोपी देखील आहे. फरार आरोपीला घेऊन जर एनसीबी त्या ठिकाणी पंच करायला लागली, तर हे कितपत बरोबर आहे मला माहीत नाही.” असंही गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले आहेत.

मुंबईत रेव्ह पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी किरण गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. ही कारवाई बनावट असल्याचा आरोपही त्यांनी केला असून त्याचे फोटो आणि व्हिडीओही प्रसिद्ध केले आहेत.