‘एक सदस्यीय रचना’ नगरसेवकांसाठी मोठी अडचणीची

0
269

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) : आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग होतो की दोन, याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र, एक सदस्यीय रचना अडचणींची ठरणार असल्याने मत अनेक विद्यमान नगरसेवकांनी व्यक्त केली. अर्थात काम करणाNयांना कशीही रचना झाल्यास अडचणी येणार नसल्याचे ज्येष्ठ नगरसेवकांनी सांगितले.

पिंपरी – चिंचवडसह काही महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होत आहेत. या पार्श्वभूमीवर एक सदस्यीय प्रभाग रचनेचा आग्रह राज्यातील महाविकास आघाडी सरकारने धरला आहे, तर भाजपने किमान दोन सदस्यांच्या प्रभागांबाबत अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे प्रभाग रचना कशी होते, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. याबाबत काही नगरसेवकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता काहींनी जनतेची कामे प्रामाणिकपणे करणाऱ्यांना कशीही रचना झाल्यास निवडून येण्यास अडचण नसल्याचे मत व्यक्त केले. प्रथमच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी एक सदस्यीय प्रभाग रचना झाल्यास प्रामाणिकपणे काम करणाऱ्यावर अन्याय होऊ शकतो, अशी भावना व्यक्त करत महिला आणि पुरुष असा दोन सदस्यीय रचनेला अनुकूलता दर्शविली.
महापालिकेत सत्तारूढ भाजपचे तब्बल ७७ जण २०१७ च्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यात राष्ट्रवादी कॉग्रेसमधून गेलेल्यांची संख्या अधिक होती. अर्थात चार सदस्यीय प्रभाग रचना असल्याने अनेक ज्येष्ठ विद्यमान नगरसेवकांनी स्वतःबरोबरच अन्य तिघांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याने भाजपने सहज बहुमत मिळविले. त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन भाजपची सत्ता जाऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. त्यांनी ‘एक सदस्य’ रचनेसाठी आग्रही भूमिका मांडल्याचे दिसते.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी – चिंचवडची सत्ता द्या पालकत्व स्वीकारतो, अशी घोषणा करत पिंपरी – चिंचवडकरांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी – चिंचवडकरांनीही भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली होती. त्यामुळे महापालिका इतिहासात प्रथमच ‘कमळ’ फुलले होते. त्यावेळी भाजपात ‘सबकुछ’ आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे अशी स्थिती असल्याने त्यांनीही जिवाचे रान केल्याने भाजपने १२८ पैकी ७७ जागा जिंकल्या होत्या. आता परिस्थिती बदलली असल्याने अनेकांचे तळ्यात – मळ्यात सुरू झाल्याचे दिसून येत आहे. काही ज्येष्ठ नगरसेवक मात्र प्रभाग कसाही झाला तरी काम करणाNयांना अडचणी नसल्याचे ठणकावत आहेत. तर, बहुसंख्य नगरसेवक एक सदस्यीय प्रभाग रचनेला अनुकूल नसल्याचे दिसून येत आहे.

जिओ मॅपिंगनुसार प्रभागाचे आराखडे तयार करणे सुरू –
पुढील वर्षी होणऱ्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाने जिओ मॅपिंगनुसार प्रभागांचे आराखडे तयार करण्यास सुरवात केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका क्षेत्रात १२८ प्रभागांचे मॅपिंग केले जाणार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभागरचना होती. या पंचवार्षिकचा कालावधी संपण्यासाठी आता पाच महिने शिल्लक राहिले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर २०१९ च्या कायद्यानुसार एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार ब्लॉक पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. द्विसदस्यीय प्रभाग रचना व्हावी, अशी बहुतांश राजकीय पक्षांची इच्छा आहे. परंतु, एक सदस्यीय प्रभाग रचनेचा कायदा संमत केला असल्याने द्विसदस्यीय प्रभाग रचनेसाठी विधी मंडळात कायदा संमत करावा लागणार आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने तयारीचा भाग म्हणून एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार ब्लॉक पाडण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात जिओ मॅपिंग करून ब्लॉक पाडण्यास सुरवात झाली आहे.

३ हजार १०२ ब्लॉग तयार
कोरोनामुळे २०२१ मध्ये जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी २०११ च्या जनगणनेचाच आधार घेतला जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहरात १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्या आहे. त्याआधारे १२८ नवीन एकसदस्यीय प्रभाग अस्तित्वात येतील. साधारणत: १४ ते १५ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असेल. एकूण ३ हजार १०२ ब्लॉग तयार आहेत. जिओ मॅपिंगद्वारे ब्लॉग तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी २०११ च्या लोकसंख्येचा आधार घेतला जाणार आहे. त्यापूर्वी २०१२ ते २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या लोकसंख्येचे ब्लॉग्स जुळविले जाणार आहे. ही माहिती महापालिकेकडे असलीतरी लोकसंख्येच्या माहितीचा वापर करण्यासाठी जनगणा विभागाची परवानगी गरजेची आहे.