Pimpri

एक लाखाची मांडवली करणाऱ्या ‘त्या’ तीन डॉक्टरांना बेड्या

By PCB Author

May 02, 2021

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील कोविड रुग्णालय निःशुल्क असताना रुग्णाच्या नातेवाइकांकडून एक लाख रुपये घेतल्याच्या प्रकऱणात तीन डॉक्टरांना अटक कऱण्यात आली आहे. स्पर्श संचालित महापालिकेच्या ऑटोक्लस्टर कोव्हिड सेंटर बाबत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महापालिका आयुक्त राजेश जाधव यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तात्काळ तीन डॉक्‍टरांना अटक केली आहे.

स्पर्श हेल्थकेअर प्रा. लि. चे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकवाडी येथील पद्‌मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांसह दुसरा अर्ज अतिरिक्‍त आयुक्‍त उल्हास जगताप (वय 55, रा. चिंचवड) यांनी रविवारी (दि. 2) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी पहाटे सुरेखा अशोक वाबळे (रा. रामदास नगर, चिखलीगाव) यांना ऑटो क्‍लस्टर येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. या रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसताना आरोपींनी सुरेखा यांच्या नातेवाइकांकडून बेड मिळवून देण्याच्या उद्देशाने धमकावून ऍडमिट करण्यासाठी पैसे लागतात, असे सांगून एक लाख रुपये घेतले व त्यांची फसवणूक केली. सुरेखा यांच्या नातेवाईकांकडून आरोपी डॉ. प्रवीण जाधव याने एक लाख रुपये घेतले. त्यातील कट प्रॅक्‍टीस म्हणून वीस हजार रुपये पद्‌मजा हॉस्पिटलचे दोन्ही डॉक्‍टरांना दिले. उपचारादरम्यान सुरेखा यांचा मृत्यू झाला.

यानंतर हे प्रकरण भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड व विकास डोळस यांनी उघडकीस आणले होते. तर शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत यावरून बराच गदारोळ झाला होता. आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करून कारवाई करावी, असा तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरून पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सहायक निरीक्षक महेश स्वामी तपास करीत आहेत.