Banner News

एक रुग्णालय चालविता येत नाही, ते महापालिका काय चालविणार?; राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष योगेश गवळी यांचा संतप्त सवाल

By PCB Author

February 18, 2019

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या भोसरीतील रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोसरीत येथील पीएमटी चौकात सोमवारी (दि. १८) जोरदार आंदोलन करण्यात आले. एक रुग्णालय चालवण्याची क्षमता नसलेले महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या खुर्च्या खाली कराव्यात, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष योगेश गवळी यांनी केली. ज्यांना एक रुग्णालय चालवात येत नाही, ते महापालिका काय चालविणार आहेत?, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, नगरसेवक अजित गव्हाणे, विक्रांत लांडे,, नगरसेविका अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक पंडितराव गवळी, जालिंदर शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवक कार्याध्यक्ष योगेश गवळी, मनीषा गटकळ, शिला भोंडवे, मारूती शिंदे, सेवादलाचे अध्यक्ष आनंदा यादव, संतोष लांडगे, शिवाजी लांडगे, अजित र. गव्हाणे, भागवत जवळकर, विराज लांडे, अमर फुंगे, सचिन कंद, संतोष शिंदे, मंगेश बजबळकर, अशोक देवकर, मयूर जाधव, सतीश फुगे, अमित लांडगे, विकास भुंबे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महापालिकेने भोसरीतील गावजत्रा मैदानाशेजारील जागेत प्रशस्त रुग्णालय उभारले आहे. कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या या निर्णयाबाबत शहरात संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रुग्णालय खासगीकरणाविरोधात थेट भोसरीत जाऊन आंदोलन केले. भोसरीतील पीएमटी चौकात हे आंदोलन झाले. आंदोलनात अनेक सामाजिक संघटनाही सहभागी झाल्या होत्या.

आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष योगेश गवळी यांनी अत्यंत तीव्र शब्दांत भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध केला. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सत्ताधारी भाजपने कोणालाही विश्वासात न घेता महापालिकेने उभारलेले रुग्णालय ३० वर्षांसाठी दुसऱ्याच्या घशात घालण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना समाविष्ट गावांतील व आसपासच्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना जवळच चांगले उपचार मिळावेत या उद्देशाने भोसरीत रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रुग्णालयाच्या कामालाही सुरूवात झाली. परंतु, राष्ट्रवादीने उभारलेल्या या रुग्णालयाचे आता सत्ताधारी असलेली भाजप श्रेय घेत असल्याची टिका योगेश गवळी यांनी केली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे चांगले तज्ज्ञ डॉक्टर मिळत नसल्यामुळे भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण केल्याचे स्पष्टीकरण देत आहेत. परंतु, त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर भरण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नसताना, कोणतीही जाहीरात दिलेली नसताना डॉक्टरच मिळत नसल्याचे सांगणे म्हणजे शहरातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सत्ताधारी भाजपला एक रुग्णालय चालवता येत नसेल, तर हे महापालिका काय चालवणार आहेत?, असा संतप्त सवालही त्यांनी केला. महापालिकेच्या इतर रुग्णालयांप्रमाणेच भोसरी रुग्णालय सुद्धा महापालिकेनेच चालविणे गरजेचे आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रुग्णालय खासगीकरणचा निर्णय झाला असला, तरी जनहितासाठी या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचे आयुक्तांना अधिकार आहेत. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर स्वतः पुढाकार घेत रुग्णालय खासगीकरणाचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा. तसेच भोसरी रुग्णालयात महिलांच्या स्तनाचा कर्करोग विभाग, ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडघे प्रत्यारोपण विभाग आणि डोळ्यांवरील शस्त्रक्रिया विभाग स्वतंत्रपणे सुरू करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. रुग्णालय खासगीकरण रद्द न झाल्यास महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर व सत्ताधाऱ्यांनी शहरातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला.”