Maharashtra

एक भाऊ गेला तर फरक पडत नाही, हा भाऊ तुमच्या पाठीशी – उदयनराजे

By PCB Author

October 18, 2019

बीड, दि. १८ (पीसीबी) – एक भाऊ गेला तर फरक पडत नाही, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे, असे सांगून माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास आज (शुक्रवार) येथे दिला.

बीड येथे पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी उदयनराजे म्हणाले की,  काँग्रेस-राष्ट्रवादीने केवळ लोकांना राबवून घेतले आणि राजकारण केले. तसेच सत्ता स्वत:च्या घरातच ठेवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मीपणा आणि अहंकार आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारण हे कायम व्यक्तिकेंद्रीत राहिले.

पंकजा मुंडे माझी बहीण आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबांना शोभेल, असे काम केले आहे. त्यामुळे उरलीसुरली काँग्रेस-राष्ट्रवादी एकटवली तरी पंकजा मुंडे यांचा विजय रोखू शकत नाही. एक भाऊ गेला तर फरक पडत नाही, हा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, असे  उदयनराजे  म्हणाले.

भाजपमध्ये प्रवेश करून  शरद पवार यांना धोका दिला नाही. समाजाशी बांधिलकी आहे म्हणून पक्ष सोडला. मात्र, परळीच्या जनतेने गोपीनाथ मुंडे यांना धोका देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही उदयनराजेंनी यावेळी केले.