Desh

एक्झिट पोल हटवा; निवडणूक आयोगाचे ट्विटर इंडियाला आदेश

By PCB Author

May 16, 2019

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – लोकसभा निवडणूक संबंधीचे सर्व एक्झिट पोल तात्काळ हटवण्यात यावेत,  असे आदेश निवडणूक आयोगाने ट्विटर इंडियाला दिले आहेत. लोकसभेच्या सातव्या टप्प्याचे मतदान रविवारी (दि.१९) होणार आहे. त्याआधी  सोशल मीडियावरील एक्झिट पोलसंदर्भातील तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत. 

निवडणुकीदरम्यान निवडणुकीवर परिणाम करेल किंवा ज्यामुळे एखाद्या पक्षाच्या विजय, पराभवाचे आकडे दिसतील, अशा सर्व एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली आहे. निवडणुकीच्या आधीचा एक्झिट पोल आचारसंहितेचा भंग मानला जातो. याआधी निवडणूक आयोगाने तीन माध्यम समूहांना एक्झिट पोलवरुन कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला आहे.

दरम्यान, सर्व टप्प्यातील मतदान पार झाल्यानंतर एक्झिट पोल  प्रसिध्द केला जातो. निवडणुकीदरम्यान प्रत्येक टप्प्यातील निवडणुकीतील माहिती यासाठी गोळा केली जाते.  मतदान करुन आलेल्या प्रत्येकाला तुम्ही कोणाला मतदान केले, याची विचारणा केली जाते. त्या आधारावर एक्झिट पोल तयार केला जातो.  मतदानाच्या शेवटच्या दिवशी एक्झिट पोल दाखवले जातात.