Desh

एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरल्यास शरद पवारांचा प्लॅन तयार      

By PCB Author

May 20, 2019

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – केंद्रात पुन्हा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून समोर आला आहे. तर एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरल्यास युपीए किंवा तिसऱ्या  आघाडीची चाचपणी करण्यास विरोधी पक्षांनी सुरूवात केली आहे.    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरोधकांची  मोट बांधण्यासाठी आणि डावपेच आखण्यास सक्रीय झाले आहेत. काँग्रेसनेही पुढील  रणनीती काय असेल, याबाबत चर्चा सुरू केली आहे.

शरद पवार यांनी प्रादेशिक नेत्यांच्या गाठीभेटी आणि फोनाफोनी सुरू करण्यास सुरूवात केली आहे. तर  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी  चर्चा करून  संभाव्य परिस्थितीचा  अंदाज घेत आहेत. दुसरीकडे एक्झिट पोल्सचे अंदाज  फेल झाले,  तर भाजपला सत्तेपासून दूर कसे राखता येईल, याबाबत   शरद पवारांनी डावपेच सुरू केले  आहेत.

ओडिशातील बीजेडी आणि आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांच्या नेत्यांशी शरद पवार संपर्कात आहेत. नवीन पटनाईक आणि जगनमोहनला सोबत घेण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. सर्व विरोधी पक्ष नेते एकत्र आल्यास भाजपला रोखता येईल, असा विश्वास  शरद पवार यांना वाटत आहे, यामुळेच पवार सक्रीय झाले आहेत.