Maharashtra

एकुलत्या एक मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल माऊलीने मानले मयुरचे आभार

By PCB Author

April 20, 2021

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : मध्य रेल्वे लाईनवर असलेल्या वांगणी स्टेशनवर आपल्या जीवाची पर्वा न करता ट्रॅकवर पडलेल्या लहानग्याचा जीव वाचवणाऱ्या रेल्वे पॉईंटमन मयुर शेळकेचा सर्वत्र कौतुक केलं जात आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल सोबतच सेंट्रल रेल्वे डीआरएम अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा मयुरच्या या धाडसाचं कौतुक केलं. शनिवारी वांगणी स्टेशन प्लॅटफॉर्मवर चालत जाणाऱ्या एका अंध महिलेच्या सोबत असलेले लहान मुल चालत असताना अचानक प्लॅटफॉर्महून खाली पडले. त्याचवेळी त्या ट्रॅकवर येणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेकडे पाहून प्रसंगावधान दाखवून अवघ्या 7 सेकंदात त्या मुलाचा जीव मयुर शेळकेने वाचविला. हा अंगावर शहारे आणणाऱ्या कौतुकास्पद प्रसंगाबाबत मयुर शेळके यांनी एबीपी माझाशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. 

शनिवारच्या दिवशी नेहमीप्रमाणे उद्यान एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने जात होती. त्यासाठी पॉईंटमन म्हणून माझं काम करण्यासाठी ट्रॅक जवळ गेलो. ज्यावेळी गाडी वांगणी स्टेशन जवळ येत होती त्याचक्षणी अंध महिलेच्या सोबत असलेला लहान मुलगा खाली ट्रॅक वर पडला. मी हे पाहताच कसलाच विचार न करता धाव घेतली. त्यावेळी काही क्षण भीती वाटली कारण तिथे आपला सुद्धा जिवाला धोका आहे असं वाटलं. पण त्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी हे धाडस करणं गरजेचं होतं आणि त्यात मी यशस्वी झालो. त्याचा खूप आनंद मला झाला आणि त्याच हे कौतुक भारावून टाकणारं आहे’, अशी प्रतिक्रिया मयुर शेळकेने एबीपी माझाशी बोलताना दिली.

सगळा थरार वांगणी स्टेशन प्लॅटफॉर्मच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्यानंतर जेव्हा हा व्हिडीओ वायरल झाला तेंव्हा या मयुर शेळकेच्या धाडसाचं कौतुक सोशल मीडियावर सर्वत्र केलं जातंय. या कौतुकाचा वेगळा आनंद मयुरला झाला असून त्यांनी याबाबत सगळ्यांचे आभार मानले व या प्रसंगातून जीव धोक्यात घालून एक कर्तव्य पार पडल्याचं त्यांनी सांगितलं.

एकुलत्या एक मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल माऊलीने मानले मयुरचे आभार वांगणी येथील अकबर चाळीत राहणाऱ्या संगीता शिरसाठ या अंध महिला ट्रेन मध्ये छोट्या वस्तू विकून आपला व सहा वर्षाचा मुलगा साहिल याचे पोट भरतात. संगीता आपल्या सहा वर्षाच्या मुलासह शनिवारी सायंकाळी वांगणी रेल्वे स्थानकावरून ट्रेनने कल्याणला निघाल्या. मात्र वांगणी स्थानकावर असताना त्यांच्या मुलाचा तोल गेल्याने तो ट्रॅकवर पडला. संगीता यांच्या लक्षात आले त्यांनी आरडाओरड केला, मात्र जवळ कुणीच नव्हते यावेळी याचवेळी एक्स्प्रेस येत असल्याने झेंडा दाखवत असलेल्या पॉईंट मन मयूर शेळके यांचे लक्ष गेले.त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ मुलाला उचलण्यासाठी धाव घेतली. समोरून एक्स्प्रेस येत असल्याचे मयूरने पाहिले मात्र डगमगता क्षणार्धात त्याने साहिलला उचलून फलाटावर फेकले व स्वतःही फलाटावर आला.क्षणाचाही विलंब झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मयूर ने स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या एकुलत्या एक मुलाला वाचवले, त्याबद्दल संगीता यांनी त्याचे आभार मानले.मयूरला कुठलातरी मोठा पुरस्कार द्या, असंही त्या म्हणाल्या.