Banner News

एका सिटवर एक प्रवासी ? रिक्षा, ओला, उबेर चालकांचा धंदा कसा चालणार ? कोरोना आख्यान भाग ४ – अविनाश चिलेकर

By PCB Author

April 29, 2020

कोरोना च्या टाळेबंदित शहरातील वाहतूक बंद असल्याने ध्वनी व हवेचे प्रदुषण ६५ ते ७० टक्के घटले. प्रशस्त रस्ते, गल्लीबोळ अगदी निर्मनुष्य झालेत. दिवसा भिती वाटेल इतकी शांतता लोक रोज अनुभवतात. याच रस्त्यांवर इतर वेळी तब्बल १५ लाख वाहने धावतात. त्यात २० हजारावर प्रवासी रिक्षा, दीड हजारावर ओला-उबेर कार असतात. सर्व कारभार थांबल्याने या वाहनांची चाके थबकली. रोज हजार-पाचशे कमवायचे आणि रोजचे रोज खायचे हा या चालकांचा खाक्या. आठवडाभराचा बंद त्यांनी सहन केला असता, आता महिना नव्हे तर दोन महिने घरी बसायचे म्हटल्यावर त्यांना अक्षरशः बुडबुडा आला. राज्यात २० लाख, पुणे व पिंपरी चिंचवड शहरात किमान एक लाख रिक्षा चालकांचाहा प्रश्न आहे. जे चालक,मालक ३०० रुपये शिफ्टवर रिक्षा घेतात त्यांचे रोजचे ९०० रुपये उत्पन्न बुडाले. ज्यांनी नवीनच रिक्षा परवाने घेतले त्यांना आता घरखर्च सोडून दोन महिन्यांचे बँक हप्ते कसे भरायचे याची चिंता लागून राहिली. नोकरी मिळत नसल्याने अनेक होतकरू युवकांनी ओला- उबेर सुरू केली. आता तेसुध्दा गोत्यात आलेत. पुन्हा मार्केट सुरू झाले आणि कदाचित एका सिटवर एकच प्रवासी बसायचे बंधन आले, तर मात्र शेअर ए रिक्षा चा धंदा संपलाच म्हणून समजा. दुसऱ्या बाजुने जिथे एका रिक्षात सहा प्रवासी बसायचे तिथे आता एक-दोन असे असतील. दुसऱा एक फायदा म्हणजे धंदा दुप्पट होईल, अशीही शक्यता आहे.

नवी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी एक लाख रिक्षाचालकांच्या बँक खात्यात थेट पाच हजार रुपये जमा केले. महाराष्ट्र शासनाने असा काही निर्णय केला तर या कष्टकऱ्यांची किमान चूल पेटेल. टाळेबंदी सुरू झाली तेव्हा रिक्षा संघटनांनी सभासदांना रेशन, जेवण सुरू केले होते. आता संघटनाची तिजोरी रिकामी झाली. जेवण देणारेही आता थकले. या कुटुंबांची दोन वेळच्या जेवणाची मारमार सुरू आहे. ऑला व उबेर चालकांचीही तीच परिस्थिती आहे. यापुढे रिक्षात बसताना मास्क सक्ती आणि सॅनिटायझर बाळगणे चालकांना अनिवार्य आहे. धंदा वाढवायचा तर मीटर प्रमाणे रिक्षा शहरात सरू केली पाहिजे.

कष्टकऱ्यांमध्ये दुसरा वर्ग म्हणजे हातगाडी, टपरी, पथारी, काच-कागद-भंगार वेचणारा वर्ग. शहराततब्बल २० हजार पथारीवाले घरी बसून आहेत. मोलमजुरी, घरकाम करणाऱ्या महिलांची संख्या २० हजारावर आहे. कोरोना प्रसार सुरू झाल्यापासून घरकाम करणाऱ्या मोलकरनींच्या नोकरीवर पहिली गदा आली. अनेकांचे काम गेले. किमान ५० टक्के महिलांची धुणी-भांडी बंद झालीत. विशेषतः हाऊसिंग सोसायट्यांमधील पांढरपेशी मंडळींनी मोलकरणींना कोरोना संपेपर्यंत सुट्टी दिल्याचे असंख्य प्रकार आहेत. काही दयाळुंनी काम न करता दोन महिन्यांचा पगार दिला, काही लोकांनी आपल्या घरकाम करणाऱ्यांना रेशनपाणी दिले. रेशनचे धान्य संपले, किराणा मोफत वाटप करणारेही येईनासे झालेत. घाम गाळून पोट भरणाऱ्यांवर स्वाभिमान गुंडाळून भोजनाच्या रांगेत उभे राहण्याची, दुसऱ्याकडे हात पसऱण्याची वेळ आली. टाळेबंदी या घटकाच्या मुळावर आली. पांढरपेशी मंडळींनी त्यासाठी ताटातला घास काढून देण्याची आपली संस्कृती जपली पाहिजे. कोरोनाचे युध्द संपल्यानंतर या मंडळींचे बस्तान नीट बसविणे महत्वाचे आहे. महापालिका महिला बाल कल्याणच्या माध्यमातून या महिलांसाठी काही उपक्रम राबवू शकते. रिक्षा चालकांना हातभार म्हणून प्रत्येकी ५ हजाराची मदत करणे सहज शक्य आहे. किमान हा वर्ग तरला पाहिजे, बस्स ! अन्यथा पोटासाठी चोऱ्या, मारामाऱ्या असले प्रकार वाढतील.