एका रात्रीत तो २४ वर्षीय तरुण ट्रम्प यांच्यापेक्षा झाला अधिक श्रीमंत

819

अमेरिका, दि.१ (पीसीबी) – अमेरिकेमधील पेनसिल्व्हेनियामधील एक २४ वर्षीय तरुण रातोरात अब्जाधीश झाला आहे. विशेष म्हणजे त्याला मिळालेल्या संपत्तीची किंमत इतकी आहे की त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांनाही संपत्तीच्या बाबतीत मागे टाकलं आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही संपत्ती या तरुणाच्या आई वडिलांनीच त्याला गिफ्ट केली आहे. या तरुणाचे नाव आहे एरिक त्से.

एरिक हा चीनमधील सर्वात मोठ्या औषध कंपन्यांपैकी एक असणाऱ्या सीनो बायोफार्मासिटीकल्स या कंपनीच्या संस्थापकांचा मुलगा आहे. सीनोचे संस्थापक त्से पिंग आणि पत्नी चेयुंग लिंग चेंग यांनी कंपनीच्या एकूण समभागांचा (शेअर्स) पाचवा हिस्सा म्हणजेच २१.५ टक्के समभाग एरिकला भेट म्हणून दिले आहेत. कंपनीचे एकूण मुल्य पाहता या समभागांची किंमत ३.८ अब्ज डॉलर म्हणजेच २६९ अब्ज रुपये इतकी होते. संपत्तीची मालकी देण्याबरोबरच सीनोने एरिकला नवीन संचालक म्हणून नियुक्त केलं आहे. एरिकच्या नियुक्तीमुळे कंपनी एका वर्षामध्ये पाच लाख डॉलरपेक्षा अधिक कमाई करेल असा विश्वास त्याच्या आई वडिलांनी व्यक्त केला आहे. सीनोचे संस्थापक त्से पिंग म्हणजेच एरिकचे वडील हे चीनमधील वरिष्ट राजकीय सल्लागारांपैकी एक आहेत.

“माझ्या आई वडिलांनी आणि कुटुंबियांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याचा मला आनंद आहे. त्यांनी माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवत मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. मी शिक्षण घेताना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करु शकेन की नाही याबद्दल नेहमी विचार करायचो. मात्र मला त्यांच्याकडून मिळालेल्या सकारत्मकतेच्या जोरावर मी नक्कीच त्या पूर्ण करेन असा विश्वास मला वाटतो. तसेच ही सकारात्मकता मी आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहचवेल,” अशी प्रतिक्रिया एरिकने दिली आहे.

त्से कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयामुळे एका रात्रीत एरिक फोर्ब्सच्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जाऊन बसला आहे. २६९ अब्ज संपत्ती असणारा एरिक हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये ५५० व्या स्थानी आला आहे. एरिकने बिजिंग आणि नंतर हाँगकाँगमध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी तो अमेरिकेमध्ये गेला. तिथे त्याने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठामधून व्हॉर्टन स्कूल ऑफ फायनान्समध्ये शिक्षण पूर्ण करत पदवी संपादन केली आहे. एरिकची एकूण संपत्ती ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि हॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्यापेक्षाही अधिक आहे.