Pimpri

एका कार्डियाकसह ‘वायसीएमएच’मध्ये तब्बल ‘एवढ्या’ रुग्णवाहिका दाखल

By PCB Author

May 03, 2021

पिंपरी, दि.०३ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना परिस्थिती आणि रुग्णवाहिका, कार्डियाक रुग्णवाहिकेची कमतरता विचारात घेवून महापालिकेने नवीन रुग्णवाहिका खरेदी केल्या असून, वायसीएम रुग्णालयात एका कार्डियाकसह नऊ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षी म्हणजेच मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. नोव्हेंबरपर्यंत शहरातील रुग्ण वाढ सुरूच होती. त्यावेळी महापालिकेला रुग्णवाहिकेची कमतरता भासू लागली. त्यामुळे वायसीएम रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार महापालिकेने रुग्णवाहिका बनविण्याचे काम दिले होते. फेब्रुवारी 2021 पासून शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता लागत होती.

दोन दिवसांपूर्वी वायसीएम रुग्णालयात नऊ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. त्यात एक कार्डियाक आणि आठ नॉन कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. कार्डियाक रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन, व्हेंटीलेटरकरीता व्यवस्था, स्ट्रेचर तसेच स्टोअरेजची सोय असून त्या वातानुकूलीत आहेत. या रुग्णवाहिकेचा शहरवासीयांना उपयोग होणार आहे.“कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव दिला होता. आता रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. या नऊ रुग्णवाहिका असून त्यात एक कार्डियाक आणि आठ नॉन कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. नॉन कार्डियाकसाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे. कार्डियाकसाठी डॉक्टर, नर्स, मदतनीस आवश्यक असतात. त्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल”.